विशेष प्रतिनिधी
मुंबई : जे आपले नेतृत्व कोण याचा निर्णय घेऊ शकत नाहीत, त्यांच्या मागे देश कधीही जाणार नाही असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीचे सरकार येणे अशक्य असल्याचे विधान केले आहे. बोल भिडू या वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. Devendra Fadnavis said- the country will not follow those who do not believe in a leadership
सत्ता राबवायची आहे चालवायची नाही
यावेळी इंडिया आघाडी सरकारवर फडणवीस यांनी हल्ला केला आहे. ते म्हणाले, ”आजच्या घडीला किती बेजबाबदार वक्तव्यं ते करत आहेत, त्यांच्या नेत्यांना विचारले तुमचा नेता कोण? तर ते म्हणतात आमच्याकडे खूप नेते आहेत. तुम्ही कुणाला पंतप्रधान करणार विचारले तर आम्ही चार-पाच लोकांना पंतप्रधान करु अशी उत्तरं देतात. हा बेजबाबदारपणा आहे. त्यांना सत्ता राबवायची आहे चालवायची नाही”, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
इंडिया आघाडीच्या ट्रेनला डबे नाही
पुढे फडणवीस म्हणाले, ”त्यांच्यात अंतर्गत वाद आहे. वेगळ्या विचारांचे लोक एकत्र येऊ शकतात पण त्यांचा एका नेत्यावर विश्वास हवा. एनडीएत जे घटक पक्ष आहेत त्यांना हे व्यवस्थित माहीत आहे की अंतिम शब्द मोदींचा आहे. पंतप्रधानपदाचा चेहरा तेच आहेत. इंडिया आघाडीच्या लोकांकडे सगळी इंजिन वेगवेगळ्या दिशांना चालली आहेत. इंडिया आघाडीच्या ट्रेनला डबे नाहीतच”, असे फडणवीस म्हणाले.
राजकारण वेगळ्या संक्रमणातून जातंय
याशिवाय ”महाराष्ट्रातील राजकारण हे एका वेगळ्या संक्रमणातून जात आहे. अजून काही वर्षे महाराष्ट्रात युती-आघाडीचे राजकारण चालणार आहे. तीन पक्ष एकत्र काम करत असताना सगळ्यांचे सगळं पटेल असे होत नाही. एकाच पक्षात अनेकदा दोघांचे पटत नाही. त्यामुळे तीन पक्ष असताना सगळं काही व्यवस्थित चालेल असे नसते. पण लीडरशीप महत्त्वाची असते. नेतृत्वाने हा प्रयत्न केला पाहिजे की त्याचा परिणाम तुमच्या गव्हर्नन्सवर होऊ नये”,असे फडणवीस म्हणाले.
युतीतील अडचणी सोडवाव्या लागतील
तसेच ”मी 2014 ते 2019 ही पाच वर्षे पूर्ण केली ते युतीचे सरकार होते. आजही एकनाथ शिंदे, मी आणि अजित पवार यांच्यात चांगला संपर्क आहे. आमचा आमचे पक्षांवर व्यवस्थित नियंत्रण आहे. पण तीन पक्ष असल्याने अडचणी येतात, त्या येतीलच, सोडवाव्या लागतील”, असे फडणवीस म्हणाले.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून शरद पवारांवर हल्ला
देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन, त्या काळात राज्यात निर्माण झालेली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आणि टीका यावर भाष्य केले. फडणीवस म्हणाले, ”शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला एक मोठा गट यामागे होता. यामध्ये काँग्रेसचाही एक घटक होता, तसेच ब्रिगेडी विचारांचाही एक मोठा गट यात सहभागी होता. मी मराठा समाजासाठी काम करत होतो ते या लोकांना बघवत नव्हते. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या, तेदेखील यांना पाहावले नाही. अनेक वर्षे काही लोक मराठा समाजाचे ठेकेदार झाले होते. परंतु मी मराठा समाजासाठी काम करू लागल्यानंतर यांचे राजकारण उद्ध्वस्त होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे माझ्याबद्दल त्यांच्या मनात एक राग आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांच राजकारण टार्गेट करावे असे त्यांनी वाटले”, असे फडणवीस म्हणाले.