• Download App
    Devendra Fadnavis मुख्यमंत्री फडणवीसांनी घातले मुंबई + ठाणे‌ + पुण्यातल्या प्रकल्पांमध्ये लक्ष, पूर्ण करण्यासाठी वेग आणायचे दिले निर्देश!!

    मुख्यमंत्री फडणवीसांनी घातले मुंबई + ठाणे‌ + पुण्यातल्या प्रकल्पांमध्ये लक्ष, पूर्ण करण्यासाठी वेग आणायचे दिले निर्देश!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, ठाणे आणि पुण्यातल्या महत्त्वाच्या विकास प्रकल्पांमध्ये लक्ष घातले. या प्रकल्पांमध्ये नेमके काय अडथळे आहेत, ते समजून घेतले. ते दूर करण्याचे आश्वासन देऊन संबंधित प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी वेग आणायचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील महत्त्वपूर्ण विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नियोजन, समन्वय आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथे सुरू असलेल्या पायाभूत विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी ‘वॉर रूम’ बैठक झाली. राज्यातील सर्व विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून विभागांमध्ये समन्वय वाढवण्यावर त्यांनी भर दिला. हे प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून दोन ते अडीच वर्षांच्या अवधीत पूर्ण होतील, अशा प्रकारे नियोजन करण्याचे आणि त्यांच्या प्रगतीचा आढावा दर 3 महिन्यात घेण्याचे निर्देश दिले.

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास हा अत्यावश्यक प्रकल्प म्हणून अधोरेखित करत या कामाला गती देण्याचे आवाहन केले. संबंधित विभाग, अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात समन्वय राखून सर्व अडथळे दूर करावेत, नागरिकांना होणारा त्रास कमी करावा आणि प्रकल्प मुदतीपूर्वी पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावे, असे त्यांनी नमूद केले.

    मुंबई मेट्रो लाईन-2 बी (डी.एन. नगर–डायमंड गार्डन) प्रकल्प 31 मार्च 2027 पर्यंत आणि स्वामी समर्थनगर–विक्रोळी मेट्रो लाईन 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. श्यामनगर स्टेशनवरील अडचणी पुढील 15 दिवसांत सोडविण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आले.
    पुणे मेट्रो लाईन-3 (मान–हिंजेवाडी–शिवाजीनगर) प्रकल्प मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून बीडीडी चाळ पुनर्विकास (वरळी, नायगाव आणि एन.एम. जोशी मार्ग) हे प्रकल्प अनुक्रमे 2029 ते 2031 या कालावधीत पूर्ण होण्यासाठी कार्ययोजना ठरविण्यात आली.

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाणे–बोरीवली ट्वीन टनेल प्रकल्प, उत्तन–विरार सी लिंक, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह अर्बन टनेल आणि ऐरोली–कटाई नाका फ्रीवे हे प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला. या प्रकल्पांमुळे प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. वडपे–ठाणे रस्ता, मुंबई–पुणे मिसिंग लिंक आणि वांद्रे–वर्सोवा सी लिंक प्रकल्पांना अधिक गती देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. प्रगती मंदावलेल्या कामांबाबत नाराजी दर्शवत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून गती वाढवावी, असे त्यांनी आदेश दिले.

    याशिवाय मागाठाणे–गोरेगाव डी.पी. रोड, फिल्म सिटी–खिंडीपाडा दुहेरी बोगदे आणि वर्सोवा–दहिसर–भाईंदर कोस्टल रोड हे प्रकल्पही नियोजित मुदतीत पूर्ण करण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला:

    ✅ ठाणे–बोरीवली ट्वीन टनल प्रकल्प

    ▪️प्रकल्पाची किंमत: ₹16,600,40 कोटी
    ▪️सुरुवात/समाप्ती: 19 मे 2023 ते 16 मे 2028
    ▪️प्रकल्पाची लांबी: 11.8 किमी (10.25 किमी बोगदा + 1.59 किमी रस्ता)
    ▪️अलाईनमेंट (मार्ग): संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून मागाठाणे (बोरिवली) ते मानपाडा (ठाणे) पर्यंत
    ▪️सध्याची प्रगती: भूसंपादन 77.50% पूर्ण झाले आहे
    ▪️मुख्य लाभ: यामुळे प्रवासाचा वेळ 60 मिनिटांवरून केवळ 15-20 मिनिटांपर्यंत कमी होईल

    ✅ ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह अर्बन टनल प्रकल्प

    ▪️प्रकल्पाची किंमत: ₹8,453.09 कोटी
    ▪️सुरुवात/समाप्ती: 22 जून 2024 ते 28 डिसेंबर 2028
    ▪️बोगद्याची लांबी: 9.9 किमी (7.2 किमी ट्विन टनेल्स)
    ▪️अलाईनमेंट (मार्ग): ईस्टर्न फ्री-वेवरील ऑरेंज गेट पासून सुरू होऊन, सरदार वल्लभभाई पटेल रोडकडे पश्चिमेला जाऊन मरीन ड्राईव्ह येथे बाहेर पडेल
    ▪️मुख्य लाभ: यामुळे प्रवासाचा वेळ 20 ते 30 मिनिटांनी कमी होईल आणि पी. डीमेलो रोडवरील वाहतूक कोंडी कमी होऊन पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी सुधारेल

    ✅ ऐरोली-काटई नाका फ्री-वे प्रकल्प

    हा एक मल्टी-फेज प्रकल्प आहे, ज्यातील फेज – 3 ची माहिती खालीलप्रमाणे –
    ▪️प्रकल्पाची किंमत (फेज – 3): ₹1,981.17 कोटी
    ▪️फेज – 3 चा कालावधी: 11 ऑक्टोबर 2024 ते 11 ऑक्टोबर 2028
    ▪️प्रकल्पाचे स्वरूप: NH-4 (जुने) पासून काटई नाक्यापर्यंत एलिव्हेटेड रस्ता
    ▪️लांबी (फेज – 3) : ग्रीनफिल्ड अलाईनमेंटसह एकूण 6.71 किमी

    इतर फेजची स्थिती:
    ▪️फेज – 1 (ठाणे बेलापूर रोड ते NH-4): 87% काम पूर्ण, 31 मे 2026 पर्यंत लक्ष्य
    ▪️फेज – 2 (ऐरोली ते ठाणे बेलापूर रोड): 92% काम पूर्ण, 31 जानेवारी 2026 पर्यंत लक्ष्य
    ▪️मुख्य लाभ: ऐरोली-कल्याण प्रवासाचा वेळ 60-90 मिनिटांवरून 20-25 मिनिटांपर्यंत कमी होईल

    ✅ कुडूस-आरे एमिल एचव्हीडीसी कनेक्टिव्हिटी
    ▪️हा प्रकल्प मुंबईला स्थिर आणि उच्च-क्षमतेचा वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आहे
    ▪️प्रकल्पाची किंमत: ₹6692 कोटी
    ▪️सुरुवात/समाप्ती: 22 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2025 (सुधारित)
    ▪️क्षमता व व्होल्टेज: 1000 मेगावॅट (± 320 kV HVDC)
    ▪️सध्याची प्रगती: प्रकल्पाची प्रगती 87.11% पूर्ण झाले आहे
    ▪️मुख्य लाभ: मुंबईला स्थिर आणि उच्च-क्षमतेचा वीज पुरवठा सुनिश्चित करणे, यामुळे वीज ग्रीडची विश्वासार्हता वाढेल आणि ब्लॅकआउट्स टाळण्यास मदत होईल

    ✅ खारघर-तुर्भे लिंक रोड
    ▪️या प्रकल्पाचा उद्देश मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) खारघर आणि तुर्भे दरम्यानचा प्रवास सुलभ करणे आहे
    ▪️प्रकल्पाची किंमत: ₹2099 कोटी
    ▪️सुरुवात/समाप्ती: 01 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2028
    ▪️एकूण लांबी: 5.96 किमी (टनेल लांबी: 1.76 किमी ट्वीन टनेल)
    ▪️मुख्य लाभ: प्रवासाचा वेळ 20 मिनिटांनी कमी होईल आणि प्रवासाचे अंतर 5 किमीने कमी होईल

    ✅ 400KV बाभळेश्वर-कुडूस लाईन

    हा प्रकल्प प्रामुख्याने मुंबईच्या वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि वीज पुरवठा मजबूत करण्यासाठी आहे.
    ▪️संबंधित संस्था: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी मर्यादित (MSETCL)
    ▪️प्रकल्पाची किंमत: ₹962 कोटी
    ▪️प्रकल्पाची लांबी: 228 किमी (400 kV Double-Circuit लाईन)
    ▪️सध्याची प्रगती: एकूण प्रगती 90.06% झाली आहे
    ▪️मुख्य लाभ: मुंबईची वाढती वीज मागणी पूर्ण करण्यासाठी क्षमता वाढवणे, ग्रीडची स्थिरता आणि विश्वासार्हता सुधारणे आणि राष्ट्रीय ग्रीडसोबत कार्यक्षमतेने जोडणी करणे

    ✅ बीडीडी एन. एम. जोशी मार्ग पुनर्विकास

    हा मुंबईतील जुन्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश रहिवाशांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे आहे
    ▪️प्रकल्पाचे ठिकाण: एन. एम. जोशी मार्ग
    ▪️प्रकल्पाची किंमत: ₹5716 कोटी
    ▪️सुरुवात/समाप्ती: 27 मार्च 2023 ते 30 जून 2031
    ▪️प्रकल्पाचे क्षेत्रफळ: 5.46 हेक्टर
    ▪️गृहनिर्माण संख्या: एकूण 3828 सदनिका तयार केल्या जातील
    ▪️मुख्य लाभ: या प्रकल्पातून 1858 परवडणाऱ्या सदनिका तयार होतील

    ✅ बीडीडी नायगाव पुनर्विकास

    ▪️संबंधित संस्था: बीडीडी चाळीचा पुनर्विकास प्रकल्प
    प्रकल्पाची किंमत: ₹7143 कोटी
    ▪️कालावधी: 10 डिसेंबर 2022 ते 19 जुलै 2029
    ▪️प्रकल्पाचे क्षेत्रफळ: 6.45 हेक्टर
    ▪️गृहनिर्माण संख्या: एकूण 5147 सदनिका तयार होतील
    ▪️सध्याची प्रगती: प्रकल्पाची प्रगती 25.44% झाली असून. रिहॅब क्लस्टर – 1 चे 82% काम पूर्ण
    ▪️मुख्य लाभ: 1858 परवडणाऱ्या सदनिका तयार होतील

    ✅ बांद्रा-वर्सोवा सी लिंक

    ▪️प्रकल्पाची किंमत: ₹18,120.96 कोटी
    ▪️सुरुवात/समाप्ती: 24 जून 2019 ते 17 मे 2028
    ▪️एकूण लांबी: 17.17 किमी (कनेक्टर्ससह; मेन सी लिंक 9.6 किमी)
    ▪️कनेक्टर्स: बांद्रा (1.17 किमी), कार्टर रोड (1.8 किमी), जुहू कोळीवाडा (2.4 किमी), वर्सोवा (1.7 किमी)
    ▪️मुख्य लाभ: प्रवासाचा वेळ 30-40 मिनिटांवरून 10-15 मिनिटांपर्यंत कमी होईल आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, एस.व्ही. रोडवरील वाहतूक कोंडी कमी होईल

    ✅ जीएमएलआर ट्विन टनेल (गोरेगाव ते खिंडपाडा, मुलुंड)

    ▪️प्रकल्पाची किंमत: ₹14,296.7 कोटी
    ▪️सुरुवात/समाप्ती: 20 नोव्हेंबर 2023 ते 19 नोव्हेंबर 2028
    ▪️एकूण लांबी: 6.62 किमी (बोगद्याची लांबी 5.30 किमी TBM टनेल)
    ▪️सध्याची प्रगती: भूसंपादन 60.04% पूर्ण झाले आहे
    ▪️मुख्य लाभ: पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि प्रवासाचे अंतर 8.8 किमीने कमी होईल

    ✅ मुंबई-पुणे मिसिंग लिंक

    ▪️प्रकल्पाची किंमत: ₹6695 कोटी.
    ▪️कालावधी: 01 मार्च 2019 ते 31 मार्च 2026 (सुधारित).
    ▪️प्रकल्पाचे स्वरूप: विद्यमान 6 लेनवरून 8 लेनपर्यंत क्षमता वाढवणे (5.86 किमी)
    ▪️प्रकल्पाची लांबी: 19.8 किमी.
    ▪️यात 2 बोगदे आणि 2 व्हायाडक्ट्स समाविष्ट आहेत.
    ▪️सध्याची प्रगती: भौतिक प्रगती 95.03% झाली आहे.
    ▪️मुख्य उद्देश: अपघातप्रवण घाट विभागांना बायपास करून रस्त्याची सुरक्षा वाढवणे.
    ▪️मुख्य लाभ: मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ 20-30 मिनिटांनी कमी होईल आणि महामार्गावरील अंतर सुमारे 6 किमीने कमी होईल.

    ✅ शिवडी ते वरळी एलिव्हेटेड कनेक्टर

    ▪️प्रकल्पाची किंमत: ₹2283.53 कोटी
    ▪️कालावधी: 13 जानेवारी 2021 ते 11 सप्टेंबर 2026 (विस्तारित)
    ▪️लांबी व लेन: 4.5 किमी लांबीचा, 4 लेनचा एलिव्हेटेड प्रकल्प
    ▪️अलाईनमेंट (मार्ग): शिवडी एमटीएचएल इंटरचेंज (पूर्व) ते वरळी सी-फेस (पश्चिम) पर्यंत
    ▪️सध्याची प्रगती: प्रकल्पाची प्रगती 65.01% झाली असून बांधकाम 61.19% पूर्ण झाले आहे
    ▪️मुख्य लाभ: हा प्रकल्प एमटीएचएलला (MTHL) बांद्रा-वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडशी थेट जोडणी देईल

    ✅ गोरेगाव मुलुंड लिंक रोड- उड्डाणपूल

    ▪️प्रकल्पाची किंमत: ₹713.58 कोटी
    ▪️कालावधी: 29 जानेवारी 2022 ते 31 मे 2026
    ▪️उड्डाणपूलाची लांबी: 3.15 किमी (मुलुंड बाजू 1.89 किमी, गोरेगाव बाजू 1.26 किमी)
    ▪️सध्याची प्रगती: प्रकल्पाची प्रगती 55.22% झाली असून बांधकाम 66.6% पूर्ण
    ▪️मुख्य लाभ: पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी सुधारेल. प्रवासाचे अंतर 8.8 किमीने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ 70 मिनिटांनी कमी होईल

    ✅ मुंबई कोस्टल रोड प्रकल्प (उत्तर) – वर्सोवा ते भाईंदर

    ▪️प्रकल्पाची किंमत: ₹ 22,166 कोटी
    ▪️सुरुवात/समाप्ती: 15 ऑगस्ट 2025 ते 30 डिसेंबर 2028
    ▪️प्रकल्पाचे स्वरूप: 4+4 लेन कॉन्फिगरेशनसह कोस्टल रोड
    ▪️मुख्य अलाईनमेंटची लांबी: 21.86 किमी
    ▪️सध्याची प्रगती: भूसंपादन 40% पूर्ण झाले आहे
    ▪️मुख्य लाभ: वर्सोवा ते भाईंदर दरम्यानचा प्रवासाचा वेळ 70-100 मिनिटांनी कमी होईल. भाईंदर ते नरिमन पॉइंट पर्यंत थेट कनेक्टिव्हिटी मिळेल.

    या बैठकीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित प्रकल्पांचे कंत्राटदार उपस्थित होते.

    Devendra Fadnavis chaired the ‘CMO Infrastructure War Room’ meeting.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Fadnavis : पार्थ पवार जमीन व्यवहारप्रकरणी फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले- प्राथमिक चौकशीचे आदेश, अनियमितता आढळली, तर कडक कारवाई

    99 % च्या मालकावर गुन्हा दाखल नाही; पालकमंत्री पित्याला घोटाळ्याची म्हणे माहितीच नाही, पण आजोबांनी “कवडीमोल” ठरविलेल्या नातवाने 300 कोटी तरी आणले कुठून??

    Bacchu Kadu : सरकारने तारीख देऊन शेतकऱ्यांना फसवल्यास आंदोलन; कर्जमाफी न केल्यास 1 जुलैला रेल रोको आंदोलनाचा बच्चू कडूंचा इशारा