”…त्यामुळे गणपती बाप्पांचा उत्सव त्याच पद्धतीनं साजरा झाला पाहिजे.” असंही म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यभरात सर्वत्र घराघरांमध्ये गणरायाचे आज आगमन झाले आहे. गणरायाच्या आगमानामुळे वातावरण उत्साही झाल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठाही फुलल्या आहेत. गणेश मंडळांनी ढोल, ताशाच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला आणलं आहे. या निमित्त सर्वचजण एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला खास शुभेच्छा दिल्या आहेत. Deputy Chief Minister Ajit Pawar gave special wishes to Janet on Ganeshotsav
अजित पवार म्हणाले, “राज्यातील जनतेला श्रीगणेश चतुर्थी आणि श्रीगणेशोत्सवाच्या भक्तीमय शुभेच्छा! भक्तिमय वातावरणात साजरा होत असलेला गणेशोत्सव निसर्गाची काळजी घेत पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करावा, असं आवाहन आहे.”
याशिवाय “श्री गणेश चतुर्थी सणाला, सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक एकतेची, समाजप्रबोधनाची, राष्ट्रभक्तीची गौरवशाली परंपरा लाभली आहे. ही परंपरा अधिक वृद्धिंगत करतानाच नागरिकांनी समाजातील सर्वांना सोबत ठेवून गणेशोत्सव साजरा करावा. श्री गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता आणि आपण सर्व श्रीगणरायांचे भक्त आहोत. त्यामुळे गणपती बाप्पांचा उत्सव त्याच पद्धतीनं साजरा झाला पाहिजे. कुटुंबातील, नात्यातील, मित्र परिवारातील, समाजातील सर्वांनी मतभेद, मनभेद विसरुन, एकत्र येऊन, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आनंदात, भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा.”असंही अजित पवार म्हणाले आहेत.
याचबरोबर ”राज्यातील काही भागात अजूनही पुरेसा पाऊस पडला नाही. राज्यात चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांवरील हे संकट दूर व्हावं. शेतात धान्याच्या आणि घरात धनाच्या राशी याव्यात. यंदाचा गणेशोत्सव शेतकऱ्यांसह आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्साह, चैतन्य घेऊन येवो. श्री गणरायांच्या कृपेनं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होवोत अशी प्रार्थना श्रीगणरायांच्या चरणी करतो.” अशी मनोकामना अजित पवारांनी व्यक्त केली.