नाशिक : दिशा चुकू देऊ नका, भागवतांनी केले भाषण; पण “पवार संस्कारितांचे” कारनामे आलेत संघ संस्कारितांच्या अंगलट!!, असेच महाराष्ट्रातल्या महायुतीच्या फडणवीस सरकार बाबत घडताना दिसले.Corruption of NCP brought mahayuti fadnavis government in fix
काल शिवजयंतीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दिल्लीतल्या मुख्यालयाचे उद्घाटन करताना केलेल्या भाषणात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संघकार्याची दिशा चुकू देऊ नका, असा इशारा दिला. एकेकाळी आपल्या कार्याला प्रतिकूलत होती, त्यावेळी आपण योग्य दिशेने काम करत राहिलो. त्यामुळे आपल्या कार्याला अनुकूलता प्राप्त झाली आहे. अशावेळी आपली दिशा चुकता कामा नये याची दक्षता घेण्याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल, असे मोहन भागवत म्हणाले. मोहन भागवतांचे हे भाषण सगळीकडे व्हायरल झाले. संघाच्या दिल्लीतल्या मुख्यालयाच्या सर्व प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या भाजप महायुतीच्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्यांनी माध्यमे व्यापली, ज्या बातम्या संघ संस्कारांच्या पूर्णपणे विपरीत होत्या, त्या बातम्या भरून गेली. भाजप महायुतीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीत सामील करून घेतले. त्यांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसू दिले. परंतु त्याचे दुष्परिणाम आता समोर यायला लागलेत. अजितदादांच्या किंबहुना “पवार संस्कारित” राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भ्रष्टाचार समोर आल्याने केवळ राष्ट्रवादीच अडचणीत आली असे नाही, तर भाजप महायुतीचे फडणवीस सरकारच भ्रष्टाचाराच्या संशयाच्या घेऱ्यात आले.
वास्तविक अजित पवारांना किंवा त्यांच्या चेल्या चपाट्यांना भाजपच्या महायुतीत घेऊन त्यांची जुनी भ्रष्टाचाराची प्रकरणे आपल्या अंगावर शेकून घेण्याचे भाजपला काहीच कारण नव्हते. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची आमदार संख्या बहुमतासाठी पुरेशी होती. त्यात अजितदादांच्या आमदारांची भर पाडून घेण्याचे काहीच कारण नव्हते. पण काही वैयक्तिक संबंधांमधून आणि काही केंद्रातल्या राजकारणाच्या “मोदी + पवारांच्या पॉलिटिकल कॉम्बिनेशन” मधून ते घडविण्यात आले. पण आता तेच भाजप महायुतीच्या प्रतिमा हानीसाठी कारणीभूत ठरले आहे. धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे यांच्यासारखे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री भ्रष्टाचारी निघाले. माणिकराव कोकाटेंना तर आरोप सिद्ध होऊन शिक्षा देखील झाली. यांची सगळ्यांची प्रकरणे जुनी आणि ती त्यांनाच भोवणारी ठरली असती, पण केवळ अजितदादांना महायुतीत स्थान दिल्याने त्यांच्या पक्षाच्या जुन्या भ्रष्टाचार प्रकरणांचा फास भाजप महायुतीच्या फडणवीस सरकारला लागला.
एकीकडे भागवतांनी आपली दिशा चुकवू नका किंवा चुकू देऊ नका, असे भाषण केले. पण दुसरीकडे राजकारणातल्या धकाधकीत राष्ट्रवादीला बरोबर घेण्याची दिशा चुकली, हे सरकार स्थापनेनंतर केवळ चार महिन्यांमध्ये समोर आले. अर्थात अजूनही वेळ गेलेली नाही. भाजप महायुती सरकारच्या कारकिर्दीची ही सुरुवात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणांमधून सुरुवातीलाच योग्य तो धडा घेऊन अजितदादांची राष्ट्रवादी भाजप महायुतीतून झटकून टाकली, तर पुढची प्रतिमा हानी टळणार आहे. कारण “पवार संस्कारित” “राजकीय कारली” संघ संस्कारांच्या तुपात कितीही तळली आणि साखरेत घोळली, तरी कडू ती कडूच राहणार आहेत. कारण त्यांचे कारनामे जुने आहेत. त्यांचे हिशेब त्यांनाच चुकते करू दिले पाहिजेत. ते भाजप महायुतीच्या फडणवीस सरकारने आपल्या अंगावर ओढवून देण्याचे काहीच कारण नाही.
– भाजपच्या आमदारांना शिस्तीचा बडगा, पण…
मध्यंतरी भाजप संघटन पर्वाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याबद्दल काही आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे झापले. त्यांना मंत्रालयात काही दिवस येण्याची बंदी घालण्याची भाषा केली. भाजपच्या पक्षीय शिस्तीच्या दृष्टिकोनातून ती योग्यच भूमिका होती. पण एकीकडे भाजपच्या आमदारांना पक्षीय शिस्तीचा बडगा दाखवायचा आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या भ्रष्टाचारी कारनाम्यांवर पांघरूण घालायचे ही दुहेरी भूमिका फार काळ टिकणार नाही. भाजपच्या मतदारांना ती आवडणार नाही. त्याविषयी भाजपच्या नेतृत्वाला कधीतरी उत्तरे द्यावीच लागतील. त्याची तयारी भाजपच्या नेतृत्वाने केली पाहिजे.
Corruption of NCP brought mahayuti fadnavis government in fix
महत्वाच्या बातम्या
- CEC नियुक्ती कायद्यावरील सुनावणी लांबली; सुप्रीम कोर्टाने दिला होळीनंतरचा वेळ
- Dhananjay Munde दमानियांच्या आरोपांना धनंजय मुंडेंचे उत्तर, शासन कार्य नियमावलीनुसार GR काढल्याचा दावा
- Hamas : गाझा युद्धबंदी कराराच्या पुढील टप्प्याची अंमलबजावणी करण्यास तयार – हमास
- Rekha Gupta भाजपने रेखा गुप्तांच्या रूपाने दिल्लीला दिला चौथ्या महिला मुख्यमंत्र्याचा लाभ!!