“या” सगळ्यांना आत्ताच कसा काय कंठ फुटला असा सवाल विचारायची वेळ रवींद्र चव्हाण, गणेश नाईक आणि संभाजी भिडे गुरुजी यांच्या वक्तव्यांमुळे आली. या तिघांनीही अशी काही अनाठाई वक्तव्ये केली, की त्यामुळे हिंदुत्ववादी शक्तींमध्येच भांडणे लागल्याची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात रंगली.Controversial statements by ravindra chavan, Ganesh Naik and sambhaji bhide guruji
– रवींद्र चव्हाणांची मुक्ताफळे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणुकीच्या ऐन मध्यावर विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसण्यासंदर्भात वक्तव्य केले त्याचा भाजपला लातूर महापालिकेत फटका बसला. पण रवींद्र चव्हाण यांचे केवळ वक्तव्यच भाजपला भोवले असे नाही, तर त्यांची राजकीय कृती सुद्धा कल्याण डोंबिवली परिसरात भाजपला भोवली कारण त्यांनी कारण नसताना स्वबळाचा आव आणत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला डिवचले. त्यामुळे अंबरनाथ मध्ये हातात तोंडाशी आलेली सत्ता सुद्धा त्यांना गमवावी लागली. उल्हासनगर महापालिकेत शिंदेंच्या सेनेने भाजपला अलगद बाजूला टाकले. MMRD रिजन मधल्या महापालिकांमध्ये सुद्धा शिंदे सेनेला बाहेरून बळ मिळवावे लागले, पण त्यातून शिंदे सेनेचा तोटा झाला नाही, तर भाजपचा जास्त तोटा झाला.
– गणेश नाईक शिंदेंना संपवायला निघाले, पण…
त्याचवेळी गणेश नाईक यांना सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कंठा फुटला ते मूळचे शिवसैनिक असले तरी तर थेट पवार संस्कारांमधून भाजपमध्ये आल्यामुळे त्यांच्यावरचे पवार संस्कार पुरते पुसले गेले नाहीत म्हणूनच त्यांनी भाजपने परवानगी दिली तर एकनाथ शिंदे यांना संपवून टाकू अशी दमदाटीची भाषा वापरली. वास्तविक एकनाथ शिंदे यांना संपविणे हा जर गणेश नाईक यांचा “घास” असता, तर त्यांनी भाजपच्या परवानगीची कधीच वाट पाहिली नसती. त्यांनी आधीच एकनाथ शिंदे यांना संपवून टाकले असते, पण गणेश नाईक यांच्या तोंडात जरी दम असला तरी प्रत्यक्ष राजकीय कर्तृत्वात ते एकनाथ शिंदे यांच्या पेक्षा फारच कमी पडलेत. म्हणून तर त्यांना भाजपच्या वळचणीला येऊन नवी मुंबईतली सत्ता वाचवावी लागली. त्या उलट एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्रपणे अगदी भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या पाठिंब्यावर का होईना पण स्वतःचे अस्तित्व टिकवले. विधानसभा, नगरपालिका, आणि महापालिका निवडणुकांमध्ये विशिष्ट मर्यादेत राहून व्यवस्थित यश मिळवले. ते गणेश नाईक यांच्यासारख्या नेत्यांना जमले नाही. नवी मुंबई पलिकडे गणेश नाईक पोहोचू शकले नाहीत.
– भिडे गुरुजींना फुटला “कंठ”
गणेश नाईक यांच्या पाठोपाठ संभाजी भिडे गुरुजींना सुद्धा आज अचानक “कंठ” फुटला. शरद पवार देशद्रोही असल्याचा आणि लवासा ही महाराष्ट्राला लागलेली कीड असल्याचा “साक्षात्कार” त्यांना आजच झाला. जणू काही पवार “देशद्रोही” आहेत आणि लवासा ही महाराष्ट्राला लागलेली “कीड” आहे, हे संभाजी भिडे गुरुजींना आधी माहितीच नव्हते!! महाराष्ट्रात 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका सुरू झाल्यानंतर संभाजी भिडे गुरुजींना “अचानक” पवार हे “देशद्रोही” वाटू लागले आणि लवासा ही “कीड” असल्याचे भासू लागले. यात “बरेच काही” आले!!
– स्क्रिप्ट कुणाची??
हे काही एकदम घडले नाही. वर उल्लेख केलेल्या सगळ्या नेत्यांना जे “कंठ” कुठले ते कुणाच्या स्क्रिप्ट मधून असू शकतात, हे सांगायला फार मोठ्या राजकीय तज्ज्ञाची गरज नाही. एकनाथ शिंदे यांचे बळ असेपर्यंत ठाकरे ब्रँड चालवावा लागेल, तसेच महाराष्ट्रात कुठे ना कुठे पवार ब्रँड सुद्धा चालवावा लागेल त्यातूनच तर काँग्रेसला वेगवेगळ्या पद्धतीने अटकाव करता येईल. म्हणून मग या दोन ब्रँडचा परस्पर बँड वाजवायला या तीन नेत्यांना कुणी सांगितले असेल, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.
– कुठेतरी “मुरले पाणी”
नुकत्याच झालेल्या महापालिकांमध्ये पवार नावाचा ब्रँड कुठेच चालला नाही. शरद पवार तर पूर्ण गप्प होते. सुप्रिया सुळेंनी सुद्धा कुठेच प्रचार केलेला दिसला नाही. पवार ब्रँडचे फक्त अजित पवार एकटेच पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये लक्ष घालून होते, पण तिथे ते कारण नसताना भाजपच्या अंगावर गेले. त्यामुळे भाजपच्या स्थानिक शिलेदारांनी त्यांना दणकून आपटले. राष्ट्रवादीचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले. अशा स्थितीत काँग्रेसला थोड्या अशा पल्लवीत झाल्या असे वाटले नसेल ना आणि तसे वाटले असेल, तर त्यांना वेळीच ठोकण्यासाठी मग अचानक भिडे गुरुजींना कोणी “कंठ फुटायला” लावला नसेल ना, अशी शंका आल्यास तिला गैर म्हणता येणार नाही. भिडे गुरुजी पवारांवर बोलले, की त्यांच्या राष्ट्रवादीचे नेते भडकणार. ते भिडे गुरुजींच्या अंगावर जाणार आणि त्याचा पुणे जिल्हा परिषदेत तरी राष्ट्रवादीला “परस्पर लाभ” होणार, हे भाजपच्या नेत्यांना समजलेच नसेल, असे अजिबात म्हणता येणार नाही, तरी देखील भिडे गुरुजी बोलले याचा अर्थच कुठेतरी “पाणी मुरले”, असा काढला, तर तोही गैर म्हणता येणार नाही.
Controversial statements by ravindra chavan, Ganesh Naik and sambhaji bhide guruji
महत्वाच्या बातम्या
- CM MK Stalin : स्टालिन म्हणाले- तमिळनाडूमध्ये हिंदीसाठी जागा नाही; भाषा लादण्याचा नेहमीच विरोध करू
- 77 व्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राची प्रगती आणि आर्थिक आत्मनिर्भरतेचा जयघोष; उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर!!
- उपासना धर्मापुरता मर्यादित राहिलेल्या समाजाला राष्ट्रधर्माची गरज; भैय्याजी जोशींचे प्रतिपादन
- संविधानाचा जागर ते दुष्काळ आता भूतकाळ; प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत चित्ररथांची झलक!!, पाहा फोटो फीचर