वृत्तसंस्था
पुणे: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यायची रास्त किफायतशीर किंमत (एफआरपी) थकवली. त्यामुळे साखर आयुक्त कार्यालयाने साता-यातील किसनवीर सहकारी कारखान्यावर मालमत्ता जप्तीची कारवाई केली. Confiscation of assets of Kisanveer Sugar Factory; Sugarcane growers exhausted FRP amount
ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना कारखान्याने ७६ कोटी १८ लाख रूपये देणे बाकी आहे. त्यामुळे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी या कारवाईचे आदेश दिले.
कारखान्याने यंदा ३ लाख ८५ हजार ७० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याची एफआरपी प्रति मेट्रिक टनास २५६९. ९४ रुपये आहे. परंतु कारखान्याने ३१ मार्चअखेर देय एफआरपी रक्कम थकीत ठेवली. त्यामुळे कारखान्यावर ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे.
रक्कम देण्याचा शब्द पाळला नाही
आयुक्त गायकवाड यांनी कारखान्याला यापूर्वी नोटीस बजावली होती. तसेच म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. १५ मार्च रोजी सुनावणी घेतली. कारखान्यास निर्यात साखर विक्री कराराप्रमाणे रक्कम प्राप्त होणार आहे. त्यातून पुढील ७ दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करणार असल्याचे कारखान्याने सुनावणीत सांगितले. मात्र, शब्द पाळला नाही. त्यामुळे आयुक्त गायकवाड यांनी ही कारवाई केली.