प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरेंनी शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह गमावल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी लढाई जुंपलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगळीच स्पर्धा तयार झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकापाठोपाठ एक अशा तीन नेत्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स मुंबईत लागली आहेत. जयंत पाटील, अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची पोस्टर्स मुंबईत नेपियन सी रोड इथल्या मुख्यालयासमोर कार्यकर्त्यांनी लावल्याचे आढळले आहे. पण भावी मुख्यमंत्री म्हणून आपले पोस्टर्स लागल्यानंतर सुप्रिया सुळे संतापल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे. Competition of chief ministership increased in NCP, now supriya sule posters of future chief minister in front of NCP office in Mumbai
जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा मतदार संघामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून काही कार्यकर्त्यांनी पोस्टर्स लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या मुख्यालयासमोर देखील असे पोस्टर लावले होते. हे पोस्टर कोणी लावले?, त्यांची नावे त्या पोस्टर्स वर होती. पण त्यानंतर अजितदादांचे भावी मुख्यमंत्री पोस्टर मुख्यालयासमोर झळकले. त्या पोस्टरवर बाकी कोणाचे फोटो अथवा नावे नव्हती. त्यानंतर आज खासदार सुप्रिया सुळे यांचे देखील पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर राष्ट्रवादीच्या मुख्यालयासमोर लावल्याचे दिसले आहे. अशी पोस्टर्स लावल्याने राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा लागल्याचेही दिसून येत आहेत.
मात्र आपल्या परवानगीशिवाय भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. कोणत्याही महिलेचा फोटो तिच्या परवानगीशिवाय वापरणे योग्य नाही. कोणाच्या घरातील महिला, भगिनी बाबत असा प्रकार झाला असता तर चालले असते का?, असा सवाल करीत पोलिसांनी आपले भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावणाऱ्या व्यक्तीला शोधून काढावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून स्पर्धा तीव्र होण्याची ही वेळ हा साधा योगायोग नाही. त्याला शिवसेनेत उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा पेटलेल्या संघर्षाची मोठे राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राजकीय दृष्ट्या संपुष्टात आल्याने आपली “पॉलिटिकल स्पेस” वाढेल, अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला वाटत आहे आणि त्यामुळे आपली आपले संख्याबळ विधानसभा निवडणुकीत वाढवून मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत राष्ट्रवादीचा उमेदवार उतरवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मनसूबा दिसतो आहे.
महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना तशी शंका व्यक्त केलीच आहे. शिवसेनेसारखा पक्ष संपल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसला वाढण्यासाठी संधी नाही. त्यामुळेच शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची लालूच दाखवून तो पक्ष हळूहळू संपवला, असा दावा मुनगंटीवार यांनी कालच केला आहे.
या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर जयंत पाटील अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे या तिघांची एकापाठोपाठ एक अशी भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लागणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाकांक्षा जाहीररित्या मांडण्यासारखे झाले आहे. आता राष्ट्रवादीतल्या भावी मुख्यमंत्री परशा स्पर्धेत हे तिघेच राहतात की आणखी काही लोक सामील केले जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Competition of chief ministership increased in NCP, now supriya sule posters of future chief minister in front of NCP office in Mumbai
महत्वाच्या बातम्या