विशेष प्रतिनिधी
कसबा आणि चिंचवड मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने चुरस आणण्याचा जरूर प्रयत्न केला आहे, पण भाजपने तिथे लावलेली ताकद आणि त्यांचा आधीच असलेला मजबूत व्होटर बेस यापुढे आघाडीतील विस्कळीत प्रयत्न किती यशस्वी होऊ शकतील?, याविषयी शंकाच आहे, तरी देखील महाविकास आघाडीने शरद पवार यांच्यासह प्रचाराच्या सगळ्या तोफा कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत उतरवून दाखविल्या आहेत. अगदी उद्धव ठाकरेंनी देखील मातोश्रीत बसून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.
अशा स्थितीत मूळात कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघातली राजकीय परिस्थिती ही नेहमीच हिंदुत्ववादी पक्षांना अनुकूल राहिल्याचे दिसले आहे. दोन्ही मतदारसंघातला कॉमन फॅक्टर काढायचा झाला तर कसबा हा जुन्या पुण्याची हार्टलँड तर चिंचवड मध्ये जुनी गावे त्यामुळे तिथले वाडे, भावकीचे राजकारण हे वैशिष्ट्य राहिले आहे. कसबा पारंपारिक दृष्ट्या भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. याला 1980 पासून फक्त दोन अपवाद ते म्हणजे काँग्रेसचे उल्हास काळोखे आणि तात्या थोरात हे आमदार होऊन गेले आहेत. Chinchwad Byelection : advantage BJP, NCP struggles to contain Shivsena rebellion
चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व हा इतिहास
चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्याआधी काँग्रेसचे वर्चस्व होते हे खरे, पण त्यावेळी रामकृष्ण मोरे आणि अजितदादा पवार हे महापालिकांवर महापालिकेवर वर्चस्व राखून होते 2014 नंतर ही परिस्थिती पूर्ण बदलली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तिथे संघर्षाच्या स्थितीत आहे तर काँग्रेस अस्तित्वासाठी झगडत आहे. त्या उलट नव्या राजकीय परिस्थितीत भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचा जबरदस्त जोर आहे. चिंचवडचा मतदारही हिंदुत्ववाद्यांना अनुकूल राहिल्याचे किंबहुना (कै.) लक्ष्मण जगताप यांच्यासारख्या नेतृत्वाने तो आपल्या राजकीय कर्तृत्वाने अनुकूल केल्याचेच परिणाम दिसले आहेत. चिंचवड मध्ये जसे शहरीकरण वाढले तसा हिंदुत्ववादी मतदारांचा कौल हिंदुत्ववादी पक्षांकडे वाढल्याचेही दिसून आले. हे काहीसे मुंबई – ठाणे शहरासारखे राजकीय चित्र आहे. मुंबई ठाण्यातून काँग्रेस वाईप आऊट झाली. शिवसेना आणि भाजपचे जसे वर्चस्व निर्माण झाले. तशीच स्थिती चिंचवड मध्ये आली आहे.
अजितदादांचे प्रयत्न
चिंचवड मध्ये अजितदादांनी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा पायरोवा करण्याची संधी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत हे खरे, कारण ही निवडणूक महापालिकेची सेमी फायनल मानली जाते पण तरी देखील अजितदादांच्या प्रयत्नांना आता मूलभूत मर्यादा पडल्या आहेत. एकेकाळी (कै.) लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष होते. पण त्यांना शरद पवारांनी विधान परिषदेवर अपक्ष म्हणून संधी दिली होती. राष्ट्रवादीच्या या अशा परोक्ष राजकारणाने नेहमीच पक्ष संघटनेचे पिंपरी चिंचवड मध्ये नुकसान केले आहे. स्वतःचा व्होटर बेस असूनही राष्ट्रवादी नेहमीच पक्ष आणि अपक्ष असा खेळ करत राहिल्याने राष्ट्रवादीचा पारंपारिक व्होट बेस कमी होत गेला आणि त्यातही लक्ष्मण जगताप यांच्यासारखे नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी पासून दूर गेल्यानंतर तो व्होट बेस घसरला आहे.
कलाटेंची बंडखोरी सोसायट्यांवर प्रभाव
अशा स्थितीत राहुल कलाटे यांच्यासारखा कार्यकर्ता जेव्हा बंडखोरी करतो तेव्हा राष्ट्रवादीच्याच व्होट बेसला आणखी धक्का लागतो ही वस्तुस्थिती नाकारण्यात मतलब नाही. राहुल कलाटे यांच्या राजकीय भूमिकेत तरी निदान सातत्य आहे. त्यांनी शिवसेनेतून दोन वेळा उमेदवारी करून आपला सोसायटीतला मतदार पक्का केला आहे. चिंचवड मतदार संघात रहिवासी सोसायट्या विशिष्ट प्रभाव राखून आहेत. सोसायटी मधला मतदार मतदानासाठी बाहेर आला तर याचा फायदा निश्चित राहुल कलाटेंना होणार आहे. पण कलाटेंच्या फायद्याचा तोटा मात्र राष्ट्रवादीला होण्याची दाट शक्यता आहे. कारण चिंचवड मतदार संघातला भाजपचा मतदार अश्विनी जगताप यांच्या पारड्यात मते टाकण्यापासून कोणाला रोखता येणे शक्य नाही. त्यातही राहुल कलाटेंनी वंचितचा पाठिंबा मिळवून दलित मतदारालाही आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
नानांचा भार अजितदादांवर
अशा स्थितीत नाना काटे यांचा भार फक्त आणि फक्त अजितदादांसारख्या पिंपरी चिंचवड मध्ये करिष्मा करून दाखवलेल्या नेत्यावर आहे. शरद पवारांनी चिंचवड मध्ये जरूर फेरी मारली आहे, पण त्यांच्या पत्रकार परिषदेत चिंचवड मतदार संघाच्या प्रश्न आणि मुद्द्यांवर पत्रकार परिषद होण्यापेक्षा राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावर ती केंद्रित राहिली. या पत्रकार परिषदेत स्थानिक मुद्दे जवळपास डावललेच गेले होते. त्यामुळे चिंचवड मधला काही भागातल्या पाण्याचा प्रश्न आणि बेरोजगारीचा प्रश्न या दोनच मुद्द्यांना पवार स्पर्श करू शकले. बाकी सगळा वेळ पत्रकार परिषदेतला सगळा वेळ हा फक्त पहाटेचा शपथविधी या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये गेला.
भाजपने लावली पूर्ण ताकद
प्रचाराचा आज शेवटचा दिवस असताना मधली ही लढाई एका अर्थाने विषम झाली आहे. भाजपने अश्विनी जगताप यांच्या पाठीशी पूर्ण ताकद लावली आहे. भाजपचा कार्यकर्ता आणि मतदार ताकदीनिशी प्रत्यक्ष प्रचारात उतरला आहे. याचा फायदा अश्विनी जगताप यांना होणार यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे भाजपच्या या ताकदीचा मुकाबला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे कसा करणार? आणि राहुल कलाटे यांच्या बंडखोरीतून तयार झालेला राजकीय उपद्रव कितपत कमी करू शकणार?, यावर चिंचवडचा निकाल अवलंबून आहे.
Chinchwad Byelection : advantage BJP, NCP struggles to contain Shivsena rebellion
महत्वाच्या बातम्या
- दहावी बारावी परीक्षा काळात ध्वनिप्रदूषण रोखा, मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करा; सुराज्य अभियानाची मागणी
- उद्धव आणि रश्मी ठाकरेंना राऊतांची अश्लील शिवीगाळ; रामदास कदमांचा गंभीर आरोप
- राष्ट्रवादीत भावी पंतप्रधान – भावी मुख्यमंत्री म्हणण्याची पद्धतच!!; फडणवीसांचा पवारांना टोला
- ठाकरे – पवार सरकारचा निर्णय फिरवला; MPSC नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू!!