”मी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवले होतेच की…”असं शिंदे म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी काल उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांना तसेच सकल मराठा समाजाला मनापासून धन्यवाद दिले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते. कायदेतज्ञ एखादे उपोषण सोडवण्यासाठी प्रत्यक्ष उपोषण स्थळी जाणे ही इतिहासातली पहिला घटना असेल असेही मुख्यमंत्री म्हणाले. दोन महिन्यांची मुदत जरांगे पाटील यांनी दिली आहे. मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीतले आरक्षण देण्यासाठी शासन गांभीर्याने पाऊले टाकेल असेही शिंदे म्हणाले. Chief Minister Shindes first reaction after Manoj Jarange ended his hunger strike
पत्रकारपरिषदेत शिंदे यांनी सांगितलं की, ”मी परवा मनोज जरांगे यांच्याशी बोललो होतो, त्यांना मी सांगितलं होतं की टिकणारे, कायद्याच्या चौकटीतले आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कुणबी नोंदी सापडताहेत त्यांना तपासून आपण लगेच प्रमाणपत्र देणे सुरु केले आहे. आजपर्यंत १३ हजार ५१४ नोंदी सापडल्या आहेत ही मोठी गोष्ट आहे. न्या. शिंदे समितीने दिवसरात्र काम केले. समितीने मुदत मागितली हे देखील मी जरांगे पाटील यांना सांगितले आहे. मी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवले होतेच की यासंदर्भात चर्चेतून व संवादातून हा प्रश्न सोडवायचा आहे.”
याशिवाय, ”न्यायमूर्ती शिंदे समितीला अधिक सक्षम करण्यात येईल, आवश्यक ते मनुष्यबळ देण्यात येईल. यंत्रणा वाढवून देण्यात येईल. कुणबी प्रमाणपत्रे देण्याची अंमलबजावणी वेगाने करण्यात येईल. सरकार म्हणून मराठाच नाही तर इतर कुठल्याही समाजाची फसवणूक आम्ही करणार नाही. इतर समाजावर सुद्धा अन्याय होऊ देणार नाही.” अशी मुख्यमंत्री शिंदे यांनी ग्वाही दिली.
याचबरोबर ”सर्वोच्च न्यायालयातल्या क्युरेटिव्ह याचिकेवर पण आपण काम करतो आहोत. सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी मराठा आरक्षण रद्द करतेवेळी जे निरीक्षण नोंदवले होते ते विचारात घेऊन राज्य शासनाने काल स्थापन केलेली न्यायाधीशांची समिती शासनाला आणि आयोगाला मार्गदर्शन करते आहे. मराठा समाज मागस कसा हे पाहण्याचे काम मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून करण्यात येईल. कायद्याच्या चौकटीतले टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी अतिशय गांभीर्याने काम करेल.” असं शिंदेंनी सांगितलं.
निवृत्त न्या. मारोती गायकवाड आणि न्या. सुनील शुक्रे, वकील हिमांशू सचदेव तसेच इतर कायदेतज्ञ हे मनोज जरांगे पाटील यांना भेटलेल्या शिष्टमंडळात होते . शिवाय मंत्री संदीपान भुमरे, धनंजय मुंडे, अतुल सावे, उदय सामंत, बच्चू कडू, नारायण कुचे यांनी देखील हे उपोषण सोडण्यासाठी जरांगे पाटील यांच्याशी बोलणी केली.
Chief Minister Shindes first reaction after Manoj Jarange ended his hunger strike
महत्वाच्या बातम्या
- जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांची ५३८ कोटींची मालमत्ता जप्त ; ‘ED’ची कारवाई
- बिहारमध्ये मोठी दुर्घटना! शरयू नदीत बोट उलटली; १८ जण बुडाले, ७ बेपत्ता
- श्रद्धा कपूरसमोर तुटली पापाराझीच्या महागड्या कॅमेऱ्याची लेन्स! श्रद्धा च्या आश्वासनामुळे श्रद्धाच होते कौतुक!
- क्रिकेटच्या देवाचा वानखेडेवर पुतळा; सी. के. नायडूंनंतर सचिनला मिळाला मान आगळा !!