• Download App
    Shakti Peeth Highway समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करायचा निर्धार!!

    समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करायचा निर्धार!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन समारंभातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच शक्तिपीठ महामार्ग देखील पूर्ण करू, असा निर्धार व्यक्त केला.
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्याचे लोकार्पण झाले. समृद्धी महामार्गाच्या बहुप्रतीक्षित इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्याने नागपूर येथून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर आठ तासांत पोहोचता येणार आहे. यानंतर आता शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

    समृद्धी महामार्ग रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण झाला. आता शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करणार असून त्यामुळे मराठवाड्याचे आर्थिक चित्र बदलेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग तीन शक्तिपीठांसह अनेक मोठ्या धार्मिक ठिकाणांना जोडणारा असेल.

    कसा असेल शक्तिपीठ महामार्ग?

    विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांधापर्यंत एकूण 805 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे. राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असेल. महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असेल. 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असतील. शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल 86 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

    कोणत्या देवस्थानांना हा महामार्ग जोडणार?

    कोल्हापूर – अंबाबाई, तुळजापूर – तुळजाभवानी. नांदेड – माहूरची रेणुका देवी या तीन शक्ती पीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे. परळी वैजनाथ, हिंगोली जिल्ह्यातील औंधा नागनाथ (नागेश्वर), माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर या बारा देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले :

    2014 ला आम्ही जे स्वप्न बघितले त्याची पूर्तता आज होते आहे. हा केवळ रस्ता नाही तर महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. महाराष्ट्राचे 24 जिल्हे जेएनपीटी सोबत कनेक्टेड आहेत. ते वाढवण सोबत आम्ही जोडणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या टप्प्याचे, दादा भुसे यांनी तिसऱ्या टप्प्याचे तर मी याच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन करत आहे. या महामार्गावर 73 पूल आहेत. वन्य जीवांना धोका पोचू नये यासाठी अंडर पास आणि ओव्हर पास बनवले आहेत.

    शेवटचा टप्पा 76 किलोमीटरचा आहे. यामध्ये 5 जुळे बोगदे आहेत. हा सर्वात जास्त लांबीचा हा बोगदा आहे. 60 डिग्री तापमान झाल्यास आपोआप पाणी सुरू होते आणि तापमान कमी झाल्यास आपोआप बंद होते. हे सगळे बोगदे एकमेकांना जोडले आहेत. यात 200 मेगावॉट सौर ऊर्जा निर्माण करण्याची तयारी आपण केली आहे. 22 ठिकाणी सुविधा केंद्र असतील.

    हा स्मार्ट रोड म्हणून विकसित करण्यात येत आहे. गेल कंपनीने संपूर्ण एक गॅस पाइपलाइन टाकली आहे. त्यामुळे जेवढे उद्योग या रस्त्याच्या बाजूला आहेत तिथे गॅस पुरवला जाईल. गडचिरोली इथे स्टील उद्योगाला गॅस पुरवला जाईल. शिर्डी, अजिंठा अशी ट्रॅफिक 10 लाख प्रति महिना सुरू आहे. ती आधी 2 लाख होती. आता शेवटच्या टप्प्यामुळे यात अजून वाढ होईल. वाशीच्या पुलावर ट्रॅफिक जॅम होते. ते कमी करण्यासाठी वाशीच्या पुलाचे लोकार्पण करत आहोत.

    जेव्हा काम सुरू केले तेव्हा अनेकांना वाटत होते की हे काम होणार नाही. पण आम्ही ते करून दाखवले. महायुतीच्या काळात याचे काम सुरू केले आणि आनंद आहे की महायुतीच्या काळात याचे लोकार्पण केले आहे. यापुढे आपल्याला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे. मराठवाड्याचं आर्थिक आणि औद्योगिक चित्र बदलणारा शक्तिपीठ महामार्ग आहे.

    – एकनाथ शिंदे म्हणाले :

    हा देशातला सर्वात जास्त लांबीचा आणि गेम चेंजर प्रकल्प पूर्ण झालेला आहे. हा सगळ्यात कठीण प्रकल्प होता. सुरुवातीला काही लोक हा रस्ता होऊ नये यासाठी प्रयत्न करत होते. पण मला मुख्यमंत्र्यांनी सांगितले की हा रस्ता करायचा आहे. त्यामुळे विदर्भात देखील औद्योगीकरण होईल. प्रवासाला 18 नाही, तर 8 तास लागणार आहेत.

    पर्यावरण पूरक असा हा प्रकल्प आहे. या रस्त्याच्या बाजूला आपण शेततळी केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आपण 11 लाख मोठी झाडे आणि 22 लाख लहान झाडे लावतोय. पहिल्या टप्प्याच्यावेळी काही लोक घाई करत होते. औद्योगिक विकासाला चालना देणारा हा रस्ता ठरेल. नागपूरवरून सकाळी निघालेला शेतकरी संध्याकाळी मार्केटमध्ये पोहोचेल. या आधी तीन दिवसांनी तो पोहोचायचा.

    शक्तिपीठाचा उल्लेख मुख्यमंत्री यांनी केला. मराठवाड्याला, पश्चिम महाराष्ट्राला आणि कोकणाला देखील त्याचा फायदा होईल. समृद्धी महामार्गाला देखील काही राजकीय लोकांनी विरोध केला. पण शेतकऱ्यांना त्याचा आता फायदा झाला.शक्तिपीठ देखील फायद्याचा ठरेल.

    अजित पवार म्हणाले :

    हा प्रकल्प सुरू होत असताना अनेकांनी विरोध केला. संभाजीनगरला हॉल मध्ये मीटिंगमध्ये आम्हाला विरोध करायला सांगितला. नंतर ज्यावेळी दर जाहीर केला तेव्हा ज्यांनी विरोध करायला लावला त्यांनीच जाऊन पैसे घेतले. 55 हजार 500 कोटींची खर्च होता, पण बजेट 61 हजारांवर गेले. 12 कोटी सिमेंट बॅग इथे लागल्या आहेत. फार मोठ काम राज्यासाठी झाले आहे.

    मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी सुरवात केली आणि आता ते मुख्यमंत्री असतानाच या रस्त्याचं उद्घाटन झाले, असे क्वचित होते. एकनाथ शिंदे यांचे योगदान लाभले हे विसरून चालणार नाही. आमच्या ऑडी गाडीचे सारथ्य एकनाथ शिंदे यांनी केले.

    Chief Minister Devendra Fadnavis’ determination to complete the Shakti Peeth Highway

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !