• Download App
    मराठी भाषा दिवस: धटमुट, काळेसावळे, सहनशील, अभिमानी, कलहशील असे बोलणारे 'मरहट्टे'!Characteristics of people in Marathi speaking country

    मराठी भाषा दिवस: धटमुट, काळेसावळे, सहनशील, अभिमानी, कलहशील असे बोलणारे ‘मरहट्टे’!

    तब्बल सव्वा बाराशे वर्षांपूर्वी मराठी माणसाची ओळख काय सांगितली गेली?

    दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीलेय।

    दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे।।

    म्हणजे – धटमुट, काळेसावळे, सहनशील, अभिमानी, कलहशील व दिण्णले-गहिल्ले (दिले-घेतले) असे बोलणारे मरहट्टे.

    आठव्या शतकातल्या कुवलयमाला या उद्योतनसुरीच्या ग्रंथात अठरा देशी भाषांचा उल्लेख आहे. त्यात ‘मरहट्ट’ भाषा बोलणाऱ्या देशातील माणसांची वैशिष्ट्ये, त्यांच्या लकबा यांचं हे खास वर्णन असं करून ठेवलंय.

    केव्हा?
    सव्वा बाराशे वर्षांपूर्वी.

    धटमुट – हे असं असणं ही चांगलीच बाब म्हणायची. पण रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, हृदयरोग आणि मानसिक आजार यांचा विळखा ज्या वेगानं आज महाराष्ट्राला आवळत निघाला आहे, ते पाहता मरहट्ट्यांचं हे वैशिष्ट्य आणखी किती काळ तग धरेल माहिती नाही.

    काळेसावळे – ही मूळ ओळख. काळाच्या ओघात इतकी सरमिसळ झालीय की अतिगोरा, गोरा, निमगोरा, गव्हाळ हा आता मरहट्टयांच्या कातडीचा सामान्य रंग झाला आहे…आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे गोऱ्या रंगाचं आकर्षण आता अतिप्रचंड आहे. सोयरीक जुळवताना ‘गोरा रंग हवा’, ही बव्हंशी लग्नाळू आणि त्यांच्या घरातल्यांची पहिली अट असते. जन्माला येणारं अपत्य किमान आपल्यापेक्षा ‘उजळ’ असावं हीच बव्हंशी मरहट्टया मात्यापित्यांची अपेक्षा असते. त्यामुळे काळाच्या ओघात ‘काळे-सावळे’ ही ओळख स्वतः मराठी माणसालाच फारशी पसंत नाही, असं म्हणणं वस्तुस्थितीला धरून होईल.

    सहनशील – हे एका मोठ्या जनसमूहाचं शतकानुशतके टिकून राहणारं गुणवैशिष्ट्य असू शकतं का, याबद्दल माझ्या मनात शंका आहे. व्यक्तिगत, शारीरिक, कौटुंबिक, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक, व्यावहारिक आणि आर्थिक पातळ्यांवर माणूस सहनशील असतो किंवा नसतो. व्यक्तीपरत्वे बदलणारा हा परिस्थितीजन्य गुण आहे. खास करुन आजच्या अत्याधुनिक ज्ञान-तंत्रज्ञान-विज्ञान या त्रयीने आमुलाग्र बदलून टाकलेली कम्युनिकेशन-ट्रॅव्हल-इकॉनॉमी यांची व्याख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संधी, यामुळं कोण, कुठल्या बाबतीत, कुठवर सहनशील असेल, हे सांगणं कठीण आहे.

    अभिमानी – गेल्या सव्वा बाराशे वर्षांच्या इतिहासात वेगवेगळ्या कालखंडातील प्रखर अभिमानी मरहट्टे शेकड्यांनी आहेत. प्रचलित व्याख्येनुसार स्वाभिमानी नसणारे मरहट्टेही तागडीच्या दुसऱ्या बाजूला तितकेच भरतील. स्वार्थ आणि व्यवहार पाहून प्रसंग परत्वे स्वाभिमानी आणि प्रसंगानुरूप झुकणाऱ्या मरहट्टयांची संख्याही तितकीच. त्यामुळं हा मुद्दा वादग्रस्त आहे. आजच्या काळात तर अतिसंवेदनशील. खास करुन स्वतःला ‘स्वाभिमानी’ म्हणवणारे किंवा इतरांना ‘लाचार’ ठरवणारे, हे दोघेही तडजोडवादी असल्याचे पुष्कळ दाखले त्यांच्याच नजीकच्या इतिहासात स्पष्ट दिसतात. आपण कोणाची पालखी वाहतो, त्यानुसार दोन्हीकडचे आवाज काढतात. वास्तवात ते उसनं अवसान आहे, हे (स्वतःशी प्रामाणिक असतील तर) दोघांनाही (मनोमन) मान्य असतं.

    कलहशील – सव्वाबाराशे वर्षांपूर्वी मरहट्टयांचं वर्णन या शब्दानं का करावसं वाटले असेल? कोणत्या अर्थाने मराठी कलहशील भासतात? कारण हे वर्णन केले गेले त्या आठव्या शतकानंतरच्या कालखंडात हा महाराष्ट्र पाच इस्लामी शाह्यांनी पादाक्रांत केला. इथले मातब्बर मरहट्टे हे कुलकर्णी-देशपांडे, पाटील-देशमुख, इनामदार, सरदार, जहागीरदार, वतनदार बनून या शाह्यांची चाकरी करत राहिले. उरलेले सामान्य मरहट्टे हे या कुलकर्णी-देशपांडे, पाटील-देशमुख, इनामदार, सरदार, जहागीरदार, वतनदार यांच्या छायेत जगत राहिले. हे सगळं थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत चालू राहिलं. छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीपुरता महाराष्ट्र चांगल्या अर्थाने कलहशील आणि प्रखर स्वाभिमानी दिसला. छत्रपतींनी पेरलेल्या स्वाभिमानाचा अंगार पुढं छत्रपती संभाजी महाराज आणि उत्तर पेशवाईच्या सुरुवातीपर्यंत टिकून राहिला. त्यानंतर पुन्हा ब्रिटिशांपुढे महाराष्ट्राने शरणागती पत्करली ती लोकमान्य टिळक आणि मराठी क्रांतिकारकांनी त्या विरोधात स्वराज्याचा लढा उभारेपर्यंत. अर्थात या कोणत्याही कालखंडात उद्योतनसुरी नव्हता. त्याने कलहशील हा शिक्का आठव्या शतकातच मरहट्ट्यांवर मारला. तो संयुक्तिक वाटत नाही. कारण मरहट्टे जितके कलहशील होते तितकेच अन्य प्रांतांमधले तत्कालीन भारतीय सुद्धा कलहशील होतेच. आजही हे चित्र तसंच आहे. किंबहुना भारतातल्या सर्व राज्यांमधले नागरिक (आणि प्रामुख्यानं अफगाण, बांगलादेश इथले परकीयसुद्धा) महाराष्ट्राने ज्या संख्येने सामावून घेतले तसं दुसरं राज्य देशात नाही. परप्रांतीयांची भाषा, सण, आहार-पोषाख पद्धती, संस्कृती ज्या सहजतेनं मरहट्टयांनी स्वीकारली तितकी लवचिकता कवचितच इतर प्रांतीयांनी स्वीकारली असेल. तरी मग आम्ही मराठे कलहशील कसे?

    दिण्णले-गहिल्ले – उत्तर आणि दक्षिण या दोन भारतीय संस्कृतीच्या मधोमध असणाऱ्या महाराष्ट्रातील मरहट्टे मंडळी ‘दिले-घेतले’ अशी भाषा वापरण्याइतपत व्यवहारी असतील तर ते तत्कालीन आठव्या शतकातील मरहट्टे समाजाचं वस्तुस्थितीजन्य वर्णन म्हणता येईल. त्याची संभावना दोष किंवा गुण अशी करता येणार नाही.

    म्हणूनच कुवलयमाला या उद्योतनसुरीच्या ग्रंथात आठव्या शतकात वर्णिलेलं मरहट्टयाचं वर्णन काही बाबतीत अतिशयोक्त किंवा आकसयुक्त असण्याची शक्यता आहे. उर्वरीत काही मुद्दे बारा-तेरा शतकांच्या कालौघात विरळ होत गेले आहेत.

    आपली मातृभाषा सुद्धा किती वळसे घेत चाललीय. नामदेव-ज्ञानेश्वरांची मऱ्हाटी त्या वेळच्या सामान्य, निरक्षर मराठी जनांसाठी मुखोद्गत होण्याइतपत रसाळ होती. आज आम्हाला ती सहज उमगेना. फार कशाला? हॉटमेल-ऑर्कुट पासून सुरुवात करून फेसबुकपर्यंत पोहोचलेली माझी पिढी आजच्या ‘इन्स्टाग्राम-टंबलर-स्नॅपचॅट’वाल्यांसाठी कालची झालीय. पण मी कशाला चिंता करू? मराठीत बोलणारे, वावरणारे आजही जगातल्या पहिल्या दहा क्रमांकात येतात. इथंवर वाचत आलेले आपण सर्वजण मातृभाषेच्या बाबतीत श्रीमंत होतो, आहोत. आपलं मऱ्हाटमोळेपण आपण आपल्यापुरतं निभावलं तरी भविष्याची काळजी करण्याची कारण उरणार नाही.

    Characteristics of people in Marathi speaking country

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!