विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात 32 जिल्ह्यांमध्ये 106 नगरपंचायतीच्या निवडणुकीचे 1802 जागांचे निकाल लागले असून यामध्ये भाजपने आपला प्रथम क्रमांक कायम राखला आहे. भाजपला 380 जागा मिळाल्या आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादीला 359 जागा, शिवसेनेला 297 जागा, तर काँग्रेसला 281 जागा मिळाल्या आहेत. अपक्ष आणि इतर छोटे गट-तट आघाड्या मिळून 253 जागा मिळाल्या आहेत. BJP is number one in Nagar Panchayat elections !!; NCP leaves Shiv Sena behind; Congress at number four
याचा अर्थ भाजपने महाविकास आघाडी विरोधात जनतेमध्ये आपले स्थान प्रथम क्रमांकाने पक्के केल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर हे सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. क्वचित ठिकाणी परस्परविरोधी आघाड्या केल्या होत्या. परंतु अनेक दिग्गजांना आपापल्या बालेकिल्ल्यात धक्के सहन करावे लागले आहेत.
विधानसभा निवडणुकीत भाजप प्रथम क्रमांक, शिवसेना द्वितीय क्रमांक, राष्ट्रवादी तृतीय क्रमांक आणि काँग्रेस चतुर्थ क्रमांक असा निकाल लागला होता. आता राष्ट्रवादीने शिवसेनेला मागे ढकलून नगरपंचायत निवडणुकीत तरी दुसरा नंबर मिळवला आहे. स्थानिक पातळीवरच्या आमदार खासदारांच्या रस असलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने निधी वाटपाचा चांगला वापर करून घेऊन आपल्या पक्षाला बळकटी दिल्याचे मानले जात होते. या बळकटीतून राष्ट्रवादीला भाजपवर मात करता आली नाही, पण शिवसेनेला मागे रेटण्यात राष्ट्रवादी सध्या तरी यशस्वी झाली आहे.
अनेक ठिकाणी सत्तेच्या चाव्या इतर अपक्ष छोट्या गटांकडे आहे. या गटांबरोबर जो पक्ष जास्तीत जास्त जुळवून घेईल त्या पक्षाच्या नगरपंचायतीत सत्ता स्थापन होणार आहेत. यात देखील भाजप आणि राष्ट्रवादी यांनी आघाडी घेतली आहे.