विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले असले, तरी प्रत्यक्षात भाजपला बहुमत गमवावे लागले. यातला फार मोठा धक्का महाराष्ट्रातून बसला. आता या धक्क्यातून सावरत महाराष्ट्र भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसून तयारी सुरू केली असून चुकांमधून शिका आणि उणीवांवर मात करा, या फॉर्म्युल्यावर आधारित “ॲक्शन प्लॅन” तयार केला आहे आणि त्या प्लॅनवर प्रत्यक्षात कामही सुरू झाले आहे. भाजपने विजयाची आणि परभवाची कारणे शोधण्यासाठी उणीवांवर मात करण्यासाठी 16 वरिष्ठ नेत्यांची टीम तयार केली असून ही टीम लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघ याचा सविस्तर आढावा घेऊन त्यासंदर्भातला अहवाल भाजपच्या हायकमांडला पाठवणार आहे. या अहवालावर प्रत्यक्ष काम करून भाजप आपल्या संघटनात्मक उणीवांवर काम करत विधानसभा निवडणुकीत आक्रमकपणे उतरणार आहे. BJP action plan on Maharashtra in Lok Sabha
उद्या दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून या बैठकीला महाराष्ट्राचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. आज संघाची पुण्यात बैठक होणार आहे, तर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.
16 नेत्यांची फौज तयार
भाजपला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. महाराष्ट्रात 2019 मध्ये भाजपचे 23 खासदार होते. या निवडणुकीत ही संख्या 9 वर आली. 13 जागांवर पराभव भाजपला प्रचंड मोठा धक्का बसला. पण या पराभवानंतर भाजपने अंग झटकून कामाला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे विधानसभा निवडणुकीत काढण्यासाठी भाजपने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार ज्या मतदारसंघात भाजपचा पराभव झाला, त्या मतदारसंघाची समीक्षा करण्यात येणार आहे. त्यासाठी 16 नेत्यांची फौजच भाजपने तयार केली आहे. या प्रमुख नेत्यांवर मतदारसंघात जाऊन पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आपलं होमग्राऊंड राखू न शकलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांवर नांदेडच्या विश्लेषणाची जबाबदारी देण्यात आली आहे. महायुतीने गमावलेल्या 33 मतदारसंघांचाही आढावा घेतला जाणार आहे.
जिंकलेल्या जागांचा आढावा
भाजप केवळ पराभूत मतदारसंघाचाच आढावा घेणार नाही, तर जिंकलेल्या जागांवरही भाजपने निरीक्षक पाठवून आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच येत्या 22 जूनपर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबाबतचा अहवाल द्यावा लागणार आहे. बीडची जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे, तर बारामतीची मंगलप्रभात लोढा आणि श्रीकांत भारतीय यांच्याकडे चंद्रपूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या नेत्यांवर जबाबदारी
जालना : चंद्रकांत पाटील
रामटेक : खा. अनिल बोंडे
अमरावती : आशिष देशमुख
वर्धा : आ. प्रवीण दटके
भंडारा – गोंदिया : रणजीत पाटील
यवतमाळ-वाशिम : आ. आकाश फुंडकर
दिंडोरी : विजयाताई रहाटकर
हिंगोली : आ. संजय कुटे
उत्तर-पश्चिम मुंबई : सुनील कर्जतकर
दक्षिण मुंबई : माधवी नाईक
उत्तर – मध्य मुंबई : हर्षवर्धन पाटील
उत्तर-पूर्व मुंबई : आमदार राणा जगजितसिंह
मावळ : आमदार प्रवीण दरेकर
अहमदनगर : खासदार मेधा कुलकर्णी
माढा : आमदार अमित साटम
भिवंडी : गोपाळ शेट्टी
बावनकुळेही दौरा करणार
दरम्यान आजपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विदर्भ दौऱ्यावर आहेत. बावनकुळे रामटेक, उमरेड, हिंगणा विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. यावेळी ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.
संघही दक्ष
भाजपप्रमाणेच आता संघही दक्ष झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची आज पुण्यात बैठक होत आहे. दुपारी पुणे शहरातील संघ मुख्यालय मोतीबाग येथे ही बैठक होत आहे. या बैठकीत महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर चर्चा होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संघाकडून आमदारांची कार्यशाळाही घेतली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने संघाकडून आमदारांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. महत्त्वाच्या आमदारांना प्रशिक्षित करुन विधानसभेचा आढावा घेतला जाणार आहे.
BJP action plan on Maharashtra in Lok Sabha
महत्वाच्या बातम्या
- टीकेची झोड उठली तरी अजितदादांना सोडवेना सत्तेची वळचण; पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही अजितदादांची पाठराखण!!
- POCSO प्रकरणात येडियुरप्पा यांच्या अटकेला कर्नाटक उच्च न्यायालयाने दिली स्थगिती!
- रोहिंग्या, बांगलादेशींना परत पाठवणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही; मंत्री मंगल प्रभात लोढांची ग्वाही
- काश्मीरच्या आजादीची वकिली केल्याबद्दल अर्बन नक्षल अरुंधती रॉय वर UAPA अंतर्गत खटला चालणार!!