विशेष प्रतिनिधी
बीड : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा प्रारंभ परळीच्या गोपीनाथ गडावरुन आज झाला. गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन कराड यांची यात्रा गंगाखेडमार्गे नांदेडकडे रवाना झाली.
केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर मंत्र्यांकडून जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्री मंडळातून डावलल्या मुंडे भगिनी नाराज झाल्याची चर्चा होती. आज आखेर नाराजी दूर करून पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या स्वतः यात्रेला उपस्थित राहिल्या. त्यांनी कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे.
दरम्यान, यावेळी परळी येथील गोपीनाथ गडावर फुलांची आरास करून मोठी सजावट केली होती. दुपारी एक वाजता कराड यांच्या या यात्रेला सुरुवात झाली. परंतु यावेळी मुंडे समर्थकांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली, दरम्यान गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांनी कराड यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली आहे.
या नाराज मुंडे समर्थकांना पंकजा मुंडे यांनी झापलं असून घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना यापुढे भेटायला येऊ नका, असे सुनावले. मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये पंकजा मुंडे यांनी नाराज समर्थकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र आजही मुंडे समर्थकांची नाराजी कायम असल्याचं दिसून आलं आहे.
- भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा सुरु
- गोपीनाथ गडावरून उत्साहात प्रारंभ
- पंकजा आणि प्रीतम मुंडे भगिनी उपस्थित
- गोपीनाथ गडावर फुलांची आकर्षक आरास
- यात्रा गंगाखेडमार्गे नांदेडकडे रवाना
- जोरदार घोषणाबाजी पंकजाताई समर्थकावर नाराज