Sunday, 11 May 2025
  • Download App
    Bhagwan rampure strong reaction over statue collapse चूक शिल्पकाराची की अन्य कोणाची??; शिल्पकार भगवान रामपूरेंनी परखड चिकित्सा केली!!

    चूक शिल्पकाराची की अन्य कोणाची??; शिल्पकार भगवान रामपूरेंनी परखड चिकित्सा केली!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फुटांचा ब्राँझ पुतळा सोमवारी कोसळून पडला. त्यावरून महाराष्ट्रात मोठे राजकारण झाले. विरोधकांच्या हातात आयते कोलीत आले. त्या कोलीताने विरोधकांनी सरकारला ठोकून काढले. Bhagwan rampure strong reaction over statue collapse

    पण त्या पलीकडे जाऊन पुतळा उभारणीचे शास्त्र, त्याबद्दल सरकारी पातळीवरची वर्तणूक, अनास्था आणि अनागोंदी याची परखड चिकित्सा प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी केली. हे तेच शिल्पकार भगवान रामपुरे आहेत, ज्यांनी आद्य शंकराचार्य यांचा 108 फुटी पुतळा उभारला आहे.

    शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पोलिसांनी हा पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्टचर इंजिनिअर चेतन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी परखड शब्दांत सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना नेमकी काय चूक झाली??, याची चिकित्सा केली. सर्वपक्षीय सरकारांचे त्यांनी वाभाडे काढले.

    भगवान रामपुरे म्हणाले :

    सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांचा पुतळा अशाप्रकारे कोसळणे, ही एक कलावंत म्हणून माझ्यासाठी मान खाली घालायला लावणारी घटना आहे. जेव्हा पुतळ्याची उंची 15 फुटांपेक्षा जास्त असते, तेव्हा शिल्पकारासोबत इंजिनिअरिंगचे काम जास्त महत्त्वाचे असते. पुतळ्यातील स्टीलचे रॉड उत्तम दर्जाचे असावेत. पुतळ्याची उंची जितकी जास्त तितका पाय भक्कम असावा लागतो. 108 फुटी शंकराचार्यांचा पुतळा करताना आम्ही  L&T कंपनीसोबत काम केले. या पुतळ्यासाठी 80 फूट खोल पाया खणला होता.

    उंच पुतळा करताना जमिनीचा सर्व्हे केला जातो. जमिनीत मुरूम किती, खडक किती याचा विचार होतो. भूकंप झाला तर पुतळ्यावर त्याचा परिणाम होऊ नये, याचा विचार केला जातो. भुगर्भमध्ये खडक किती, पाणी किती, हे सर्टिफाय केल्यावरच काम केले जाते. आम्हाला शंकरचार्यांचा पुतळा करताना पाया 500 वर्ष काही होणार नाही याची गॅरेंटी मागितली होती. तज्ञांनी 700 वर्ष काही होणार नाही हे सर्टिफिकेट दिल्यानंतरच काम सुरू केले.

    सरकारी कामातील त्रुटी

    सिंधुदुर्गात जर 45 किलोमीटर वेगाने जर वारे वाहत असतील, तर त्याचा विचार आधीच व्हायला हवा होता. यात चूक केवळ शिल्पकारची नाही. शासकीय कामात निविदा मागवतात, जी रक्कम सर्वात कमी त्याला काम देतात. कामाचा दर्जा न पाहता केवळ रक्कम कमी किती हे पाहिले जाते, म्हणून मी महापालिकेचे कुठले काम करायचे नाहीच हे ठरविले आहे.

    2003 साली मी सोलापुरात झाशीच्या राणीचा पुतळा केला. दोन पायावर असलेला हा पुतळा असून ही इतके वर्ष टिकून आहे. नंतर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही केला. मात्र बिल देताना महापालिकेत अनेक टेबलांवरून कमिशन मागण्यात आली. या घटनेत ही तेच असण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग मधील पुतळा उभारण्यात 100 % भ्रष्टाचार झाला असेल. या घटनेला शासनही तितकंच जबाबदार आहे.

    कुठल्याही सरकारला नेहमीच कमी वेळेत पुतळा उभारायची घाई

    सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी अनुभवी कलाकाराची निवड करणे गरजेचे होते. 4 – 5 महिन्यांत पुतळा उभारा, आमचे साहेब येणार आहेत उदघाट्नला, निवडणूक आहे त्यात जाहिरात करता येईल, असा दबाव सगळ्याच पक्षांचे नेते आणतात. कुणाचेही सरकार असले तरी, हेच होत असते. नेते उद्घाटनाची वेळ आधी ठरवतात, नंतर काम देतात. वेळेपूर्वी काम करण्यासाठी घाई करतात. चांगल्या कलावंतांना कुठल्याही पक्षाच्या सरकारचे वाईट अनुभव येतात. त्यामुळे चांगले कलावंत हे कमी पैशात उपलब्ध होत नाहीत. म्हणून अनुभव नसलेल्या कलावंतांना काम दिले जाते त्यातून निकृष्ट काम होते.

    Bhagwan rampure strong reaction over statue collapse

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ