विशेष प्रतिनिधी
मुंबई : Deva Bhau’ hoarding : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच गोंधळ उडाला आहे. कारण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘देवा भाऊ’ असा उल्लेख असलेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करणारी जाहिरात! ही जाहिरात काल सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावर झळकली, तसेच विमानतळ, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग्जच्या रूपाने सर्वत्र दिसत आहे.
जाहिरातीचे स्वरूप आणि वाद
या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आणि ‘देवा भाऊ’ असा उल्लेख आहे, परंतु महायुतीतील अन्य दोन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा कुठेही उल्लेख नाही. यामुळे ही जाहिरात महायुतीतील अंतर्गत श्रेयवादातून प्रसिद्ध झाली की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे की काय आसे बोलले जात आहे.
विरोधकांचा आक्रमक पवित्रा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांनी या जाहिरातींवर टीकास्त्र सोडले आहे. “या जाहिरातबाजीवर सरकारने ४० ते ५० कोटी रुपये खर्च केले. त्यापेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि फोटो लावा,” अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनीही सरकारवर निशाणा साधला. “महाराष्ट्रात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना, मुख्यमंत्र्यांनी अशा जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपये उधळणे अयोग्य आहे,” असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादावर सौम्य प्रतिक्रिया देत म्हटले, “आम्ही श्रेयवादाच्या भानगडीत नाही. आमच्यासाठी विकास महत्त्वाचा आहे.”
सोशल मीडियावरही वाद
सोशल मीडियावर या जाहिरातींवरून दोन गट पडले आहेत. काहींनी जनतेच्या कराच्या पैशाचा असा अपव्यय करणे अयोग्य असल्याची टीका केली आहे. “लोकप्रियतेच्या यादीत क्रमांक सुधारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणे कितपत योग्य?” असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे, फडणवीस समर्थकांनी याला पाठिंबा देत, “जाहिरात करणे काही चुकीचे नाही. सरकारच्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे,” असे मत मांडले.
या जाहिरातबाजीमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोणताही मुद्दा किरकोळ राहत नाही. आगामी काळात यावरून आणखी काय घडामोडी घडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे!
Battle over advertisement: Maharashtra politics heats up over ‘Deva Bhau’ hoarding!
महत्वाच्या बातम्या
- Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांची टीका- नितीश कुमार फक्त निवडणुकीपर्यंतच मुख्यमंत्री राहतील, नवीन CM कोण हे शहा ठरवतील
- Vanraj Andekar murder revenge : वनराज आंदेकर खुनाचा बदला खुनाने ; पुण्यात आयुष कोमकरची हत्या.
- GST : जीएसटी कपातीचा पूर्ण फायदा मिळावा यासाठी सरकारची काटेकोरपणे देखरेख
- Khadki gets its original name again : खडकीला पुन्हा मूळ नाव; 200 वर्षांनंतर ब्रिटिशकालीन ‘किरकी’ला निरोप