• Download App
    Bachchu Kadu बच्चू कडू यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; म्हणाले- पदासाठी नाही, मुद्द्यांच्या लढाईसाठी धनुष्यबाण हाती

    बच्चू कडू यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; म्हणाले- पदासाठी नाही, मुद्द्यांच्या लढाईसाठी धनुष्यबाण हाती

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: प्रहार’चे आक्रमक नेतृत्व आणि सामान्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे बच्चू कडू यांनी आज अधिकृतपणे आपल्या राजकीय प्रवासाचे नवे पान उलटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत, “शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी हा धनुष्यबाण आम्ही मजबुतीने पेलू,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या पक्षप्रवेशासोबतच बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

    शिवसेना प्रवेशावेळी बोलताना बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे स्मरण केले. ते म्हणाले की, “तुकडोजी महाराजांनी आपली ‘ग्रामगीता’ शेतकऱ्यांना अर्पण केली होती. आज त्यांच्याच जयंतीदिनी आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेसोबतचा प्रवास सुरू करत आहोत. माझी राजकीय सुरुवात शिवसेनेतूनच झाली होती आणि आता पुढील कार्यही याच पक्षात राहून अधिक प्रभावीपणे करेन.”

    एकनाथ शिंदेंच्या कार्यपद्धतीवर मोहोर

    केवळ आमदारकीच्या पदासाठी नाही, तर मुद्द्यांची लढाई अधिक मजबूत झाली पाहिजे. शिंदे साहेबांचा स्वभाव सेवाभावी आहे. ते मुख्यमंत्री असताना रात्री २ वाजता सुद्धा वर्षा बंगल्याची दारे उघडी होती. देशातील ऐतिहासिक निर्णय दिव्यांग मंत्रालय देण्याचे काम केले. कर्जमाफीत घेतलेला पुढाकार निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. म्हणून केवळ पद नाही, तर विचार जुळणे महत्त्वाचे असते. विचारासोबत कर्तृत्व महत्त्वाचे असते. त्या दोन्ही गोष्टी आम्ही शिंदे साहेबांत पाहतो. ही लढाई फक्त पदापुरतीच मर्यादीत राहणार नाही, तर आम्ही जे मुद्दे दिलेत, दिव्यांग मंत्रालयाचे बळकटीकरण, पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे असतील, हमीभावाची लढाई असेल. आमच्या विधवा भगिनी, कामगारांची लढाई आणि युवकांसाठी वेगळे धोरण, या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करून आपण हा निर्णय घेतलेला आहे.



    ‘प्रहार’ सामाजिक कार्यासाठी, राजकारण शिवसेनेचे

    प्रहार ही एक सामाजिक संघटना म्हणून पावले टाकेल, पण राजकारण मात्र शिवसेनेचे मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक उभा करू. छत्रपती शिवरायांनी जो विचार ठेवला होता, हे राज्य रयतेचे आहे. ते रयतेचे राज्य पुन्हा निर्माण व्हावे आणि त्या सर्वोच्च गादीवर आम्हाला पुन्हा शिंदे साहेब दिसावेत यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. फक्त आमदारकीसाठी आम्ही निर्णय घेतलेला नाही. आमचे मुद्दे मोठ्या पक्षाच्या हाती जावे आणि हा अजेंडा आम्ही भगवा झेंडा राबवणार आहोत. जो अजेंडा प्रहारचा पांढरा झेंडा घेऊन राबवत आहोत, आता झेंडा बदलला असला, तरी अजेंडा कायम आहे. तोच अजेंडा घेऊन पुढे जाऊ, असे बच्चू कडू म्हणाले.

    शिवसेनेत प्रवेश करताना शिंदेंपी बच्चू कडूंना दिला महत्वाचा शब्द

    बच्चू कडू यांचे एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत केले. ते म्हणाले, ”बच्चू कडू यांच्यासारखा कडवट कार्यकर्ता, सर्वसामान्यांचा नेता, दिव्यांगासाठी झटणारा, शेतमजूर, गोरगरीब, दलित, शोषित पीडित यांच्यासाठी आंदोलन करणारा, गोरगरीबांचा आंदोलक नेता, दिव्यांगांसाठी खऱ्या अर्थाने लढणारा, झटणारा नेता म्हणून बच्चू भाऊ तुमची ओळख आहे. तुम्ही आज शिवसेनेत असंख्य लोकांसह प्रवेश केला. त्यासाठी तुमचं मनापासून शिवसेनेत स्वागत करतो.”

    बच्चू कडू यांना शिवसेना नवीन नाही

    एकनाथ शिंदे म्हणाले, “शिवसेना तुम्हाला नवीन नाही. तुम्ही मूळचे शिवसैनिक आहात. 25 वर्ष प्रहार सामाजिक संघटनेचे काम केले. आज स्वगृही शिवसेनेत आलात. आपण आमदारकरीसाठी आलेला नाहीत हे स्पष्ट केले. तुमची धेय्य, धोरणे, गरीबांना न्याय देण्याचा मुद्दा याला कुठेतरी सत्तेचे बळ लागते. आपण पाहिले माझ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात, त्यावेळी अनेक निर्णय घेतलेत. आपण सोबत राहिला. बच्चू कडू यांना शिवसेना नवीन नाही, शिवसेनेला बच्चू कडू नवीन नाहीत. बाळासाहेबांनी, दिघेसाहेबांनी अन्यायाविरोधात लढायला शिकवले. आपण दोघे त्याच विचारांचे आहोत. म्हणून विचारांची लढाई, विचाराने लढायची आहे.”

    Bachchu Kadu Formally Joins Shiv Sena

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amol Mitkari : उमेदवारी नाकारताना पक्षाने साधे विचारलेही नाही; अमोल मिटकरींनी व्यक्त केली खंत

    पराभवाच्या भीतीने उद्धव ठाकरेंची सेफसाईड माघार; विधान परिषद उमेदवारीवरून संजय शिरसाटांचा टोला

    निकालाची “अशी” चाहूल : स्टालिन शांतपणे कामगार दिनाच्या कार्यक्रमात; पण ममता घुसल्या EVM च्या स्ट्रॉंगरूम मध्ये!!