विशेष प्रतिनिधी
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची एसआयटी अर्थात विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी केली. प्रस्तुत प्रकरणात राज्य सरकार आरोपी आहे. मग ते या प्रकरणाचा तपास कसा काय करू शकते? असा कळीचा प्रश्न त्यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात उपस्थित केला आहे.
परभणी पोलिसांच्या मारहाणीत न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी यांनी याविरोदता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य सरकारविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. सूर्यवंशी कुटुंबीयांतर्फे स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला. त्यात त्यांनी या प्रकरणाची न्यायालयाच्या निगराणीखाली एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली.
सोमनाथ सूर्यवंशीचा ‘शहीद’ असा उल्लेख
सुनावणीनंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना आंबेडकर म्हणाले की, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य सरकार विरोधात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज औरंगाबाद न्यायालयात सुनावणी होती. मी या प्रकरणी याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात बाजू मांडली.
न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यावर मॅजिस्ट्रेटने चौकशी केल्यानंतर पुढे काय करावे? याविषयी कायदा अपूर्ण आहे. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात नियमावली तयार करावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. विशेषतः या प्रकरणात आम्ही SIT नेमण्याची मागणीही केली आहे. ही SIT कोर्टाने नेमावी आणि कोर्टाच्या अधिपत्याखाली ती चालावी.
राज्य सरकार स्वतः आरोपी, मग ते तपास कसा करू शकते?
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आरोपी हे राज्य सरकार आहे. त्यामुळे प्रकरणात आरोपी असलेले राज्य सरकार त्याच प्रकरणाचा तपास कसा करू शकतो?, असा युक्तिवाद ही कोर्टात केला. बदलापूर प्रकरण आणि परभणी प्रकरण एकसारखेच आहे. बदलापूर प्रकरणी तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे, याही प्रकरणात तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा अशी मागणी आम्ही केली, असे आंबेडकर म्हणाले.
सीआयडीलाही आरोपी करण्याचे संकेत
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सीआयडी अर्थात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागालाही आरोपी करण्याचे संकेत दिले. मध्यंतरी CID ने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेत चौकशी केली होती. पुढच्या सुनावणीच्यावेळी आम्ही CID ला आरोपी करू. हायकोर्टाकडून राज्य सरकारसह संबंधित यंत्रणांना नोटीस जारी करण्यात आली आहे आणि 29 एप्रिल पूर्वी आपले म्हणणे सादर करायला सांगितले आहे. या प्रकरणी 29 एप्रिलला पुढील सुनावणी होईल, असे ते म्हणाले.
Appoint SIT in Somnath Suryavanshi case; Prakash Ambedkar demands
महत्वाच्या बातम्या