विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन मंत्री यांनी भ्रष्टाचार केला. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर त्यांनी प्रथम राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जायला पाहिजे असे वक्तव्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे महायुती सरकार आता त्यांचे समर्थक असलेल्या अण्णा हजारे यांच्याकडून अडचणीत आले आहे.
एरवी अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुतीच केली होती. हे दोन्ही नेते प्रामाणिक असल्याचे अण्णा हजारे म्हणाले होते. परंतु आता फडणवीस मंत्रिमंडळात अजितदादांचे दोन मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे हे भ्रष्टाचारी निघाले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. माणिकराव कोकाटे यांना तर नाशिक जिल्हा न्यायालयाने भ्रष्टाचाराच्याच आरोपाखाली शिक्षा सुनावली. या दोन्ही मंत्र्यांनी विरोधात महाविकास आघाडी आक्रमक राहिली. महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण ती राजकीय मागणी म्हणून अजितदादांच्या राष्ट्रवादीने फेटाळली.
पण आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी पुढे रेटल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता या दोन मंत्र्यांविरुद्ध काही कारवाई करणे भाग पडणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.