– सोशल मीडिया पोस्ट मधून एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत वेदनादायी, धक्कादायक दिवस आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा धक्का संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी प्रचंड मोठा आहे. एक दिलखुलास मनमिळावू, कर्तृत्ववान, अभ्यासू आणि रोखठोक नेता आपण आज गमावला, अशा शब्दांमध्ये सोशल मीडिया पोस्ट लिहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली.
– या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे म्हणतात :
अजितदादा माझ्यापेक्षा वयाने मोठे होते आणि राजकारणातील अनुभवानेही. एक उमदा सहकारी आणि त्यापलीकडे एक मोठा भाऊ गमावल्याचं मला दुःख आहे.
करतो, बघतो, सांगतो हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हते. चूक दाखवण्याची, प्रसंगी कानउघाडणी करण्याची हिंमत त्यांच्यात होती. ओठात एक आणि पोटात एक असा अजितदादांचा स्वभावच नव्हता. बोलायला रोखठोक परंतु मनाने अतिशय निर्मळ असलेला हा नेता होता. कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची ओळख होती. सामान्य माणसाला ते आपले वाटत असत.
आमदार, खासदार आणि मंत्री अशी मोठी राजकीय कारकीर्द अजितदादांनी आपल्या कर्तृत्वाने गाजवली. गेली ४० वर्षे राजकारणात दादांनी त्यांचा दबदबा कायम ठेवला.
अजितदादांनी ६ वेळा उपमुख्यमंत्री पद भूषविले. वित्त, नियोजन, सिंचन, जलसंसाधन, ऊर्जा या खात्यांमध्ये त्यांनी अत्यंत उल्लेखनीय आणि लोकाभिमूख काम केलं. कृषी, सहकार क्षेत्राची खडानखडा माहिती त्यांच्याकडे होती. आर्थिक घडामोडींचे अचूक भान त्यांना होतं. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक विषयांची त्यांना जाण होती. प्रशासनावर त्यांची मजबूत पकड होती. अर्थमंत्री म्हणून राज्याची आर्थिक घडी दादांनी कधी विस्कटू दिली नाही. विकासकामांना खीळ बसू न देता, आम्ही जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेला निधीही कमी पडू दिला नाही. राज्यातील अनेक विकास प्रकल्पांसाठी आर्थिक तरतूद त्यांनी केली.
आज दादा आपल्यात नाहीत आणि उद्यापासून ते दिसणारही नाहीत, ही कल्पना सुद्धा मनाला पटत नाही. पवार कुटुंबावरही काळाने घाला घातलाय. त्यांच्यासाठी हा क्षण अत्यंत दुःखद असून त्यांच्या सांत्वनासाठी कोणतेही शब्द अपुरेच पडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील लाखो लोकांमध्ये आज पोरके झाल्याची भावना आहे.
अजितदादा आता आपल्यात नसल्याने राज्याची अपरिमित हानी झाली आहे. मी शिवसेनेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
Ajit Pawar Passes away : said by Eknath shinde
महत्वाच्या बातम्या
- CM MK Stalin : स्टालिन म्हणाले- तमिळनाडूमध्ये हिंदीसाठी जागा नाही; भाषा लादण्याचा नेहमीच विरोध करू
- 77 व्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राची प्रगती आणि आर्थिक आत्मनिर्भरतेचा जयघोष; उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर!!
- उपासना धर्मापुरता मर्यादित राहिलेल्या समाजाला राष्ट्रधर्माची गरज; भैय्याजी जोशींचे प्रतिपादन
- संविधानाचा जागर ते दुष्काळ आता भूतकाळ; प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत चित्ररथांची झलक!!, पाहा फोटो फीचर