नाशिक : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होऊन 15 दिवस उलटले तरी अद्याप मंत्र्यांचे खाते वाटप झालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळून दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह सगळे मंत्री आजही बिन खात्याचे मंत्री म्हणून कार्यरत आहेत, म्हणून सरकारचा कारभार ठप्प झाला आहे, असे नाही. पण लवकरच खातेवाटप होण्याची देखील अपेक्षा आहे.Ajit pawar has to choose only one between finance ministry and pune guardian ministership
या पार्श्वभूमीवर आपली जुनीच खाते टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा आग्रह असला, तरी भाजप मात्र आता अधिक “त्याग” करण्याच्या मन:स्थितीत नाही. एकनाथ शिंदे यांना सुरुवातीलाच “कन्व्हिन्स” करून त्यांना त्यांचे लाडके नगर विकास खाते द्यायची तयारी भाजपने दाखवली असली, तरी अजित पवारांना मात्र भाजपने आता स्पष्ट शब्दांमध्ये “दोन पैकी एक निवडा” असे सांगितल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. याचा अर्थच भाजपने आता अजितदादांची “दादागिरी” उतरवायला सुरुवात केली आहे.
अजितदादा हे मागच्या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री होते. फडणवीस यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात मात्र अजितदादांना अर्थ मंत्रालय किंवा पुण्याचे पालक मंत्रीपद या दोन पैकी एकच पद मिळू शकेल. त्यामुळे या दोन पदांपैकी एक पद तुम्ही निवडा, असे भाजप नेत्यांनी अजितदादांना स्पष्ट शब्दांत सुनावले आहे.
पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांतदादा पाटील विधानसभेवर निवडून गेल्याने ते पुण्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे. अजित पवार महायुतीत येण्यापूर्वी चंद्रकांतदादा पाटील हेच पुण्याचे पालकमंत्री होते. परंतु, अजितदादांच्या महायुतीतल्या एन्ट्री साठी भाजपने सांगितल्यानंतर चंद्रकांतदादांनी पुण्याच्या पालकमंत्री पदाचा “त्याग” केला होता. स्वतः त्यांनी तसे वक्तव्य त्यावेळी केले होते.
पण विधानसभा निवडणुकीनंतर सगळीच राजकीय गणिते बदलली असून भाजप स्वतःच्या 132 या संख्याबळाच्या जोरावर कोणाचेही जास्त चालू देणार नाही. विशेषत: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची “दादागिरी” तर बिलकुलच खपवून घेणार नाही, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सगळ्या नेत्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. त्यामुळे अजितदादांना अर्थ मंत्रालय किंवा पुण्याचे पालकमंत्री पद या दोन पैकी एक निवडण्याची वेळ आली आहे.
काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांची मंत्रिमंडळात “दादागिरी” चालायची. मुख्यमंत्री काँग्रेसचे असले, तरी अजित पवार हेच सरकार चालवत असल्याचा आभास निर्माण केला जायचा. काँग्रेसला देखील संख्याबळाच्या अभावी राष्ट्रवादी काँग्रेसची “दादागिरी” सहन करायला लागायची. पण भाजपकडे आता स्वतःचे संख्याबळ एवढे आहे की, अजितदादांच्या “दादागिरीची मात्रा” इथे चालणार नाही. त्यामुळे अजितदादांची आणि राष्ट्रवादीची “दादागिरी” उतरवायचे भाजपने ठरवले असून ते कुठल्या बोलण्यातून किंवा वक्तव्यातून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देण्यावर भाजपचा भर आहे.
Ajit pawar has to choose only one between finance ministry and pune guardian ministership
महत्वाच्या बातम्या
- Kulgam : कुलगाममध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, 5 दहशतवादी ठार
- Mukesh Rajput : भाजपचे दोन खासदार पायऱ्यांवरून पडले; मुकेश राजपूत आयसीयूमध्ये दाखल, सारंगींवरही उपचार सुरू
- Shivraj Singh Chouhan : ‘राहुल गांधी विरोधी पक्षनेते होण्याच्या लायक नाहीत’, शिवराज सिंह चौहान यांचा हल्लाबोल!
- Good News : कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार!