राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या वळचणीशिवाय राहू शकत नाही, असेच शरद पवारांचे त्यांना सोडून गेलेले नंबर 2 प्रफुल्ल पटेल यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत उघडपणे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 पैकी 51 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच सत्तेवर जाण्यासाठी शरद पवारांना पत्र दिले होते. पण पवारांनी आयत्यावेळी कच खाल्ली. त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी होऊन त्यांना मुख्यमंत्रीपद देखील मिळाले, असे प्रफुल्ल पटेलांनी त्या मुलाखतीत सांगून शरद पवारांना पुरते “एक्सपोज” केले. Ajit pawar followed Y. B. Chavan lust for power way to join hands with BJP
एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसने 51 आमदारांच्या बळावर भाजपशी वाटाघाटी केल्या असत्या, तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याला म्हणजेच अजित पवारांना मुख्यमंत्री पदही मिळाले असते असेच प्रफुल्ल पटेल यांनी यातून सूचित केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या “नैसर्गिक स्वरूपाचा” हाच तर सगळ्यात कळीचा मुद्दा आहे!! राष्ट्रवादी काँग्रेस कधीच सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्तेच्या वळचणीला राहिली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्वच उरत नाही, हे प्रफुल्ल पटेल यांनी या मुलाखतीतून उघडपणे सांगितले.
याचा दुसरा अर्थ असा की राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा कल ओळखूनच अजित पवार “यशवंत मार्गाने” सत्तेच्या वळचणीला निघून गेले आणि शरद पवार फक्त काल प्रीतीसंगमावर समाधी दर्शनाला जाऊन आले. स्वाभिमानाचे राजकारण नव्हे, तर “सत्तेची वळचण” हाच खरा “यशवंत मार्ग” आहे!!
कारण यशवंतराव चव्हाण यांनी नेहरू, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी अशा तीन पंतप्रधानांच्या कारकिर्दीत मुख्यमंत्री पदापासून केंद्रीय मंत्री पदांपर्यंतची सर्व पदे भोगली. पण ते कधीच कोणत्याही पंतप्रधानांना यशस्वीरित्या आव्हान देऊ शकले नाहीत. जेव्हा त्यांनी आव्हान देण्याचा किरकोळ प्रयत्न केला, तेव्हा पहिल्याच फटक्यात त्यांना माघार घ्यावी लागली. नुसती माघार घ्यावी लागली असे नाही तर, शरणागती पत्करावी लागली. त्यामुळेच ते सत्तेच्या वळचणीला टिकून राहू शकले. हा यशवंतराव चव्हाण यांचा इतिहास आहे. तो खुद्द यशवंतरावांनीच कबूल केल्याची साक्ष 1970 आणि 80 च्या दशकातल्या अनेक पत्रकार – संपादकांनी दिली आहे. यात भाऊ पाध्ये, गोविंद तळवळकर, वि. स. वाळींबे, ग. वा. बेहेरे आदींचा समावेश आहे. या प्रत्येकाने यशवंतराव कसे कुंपणावर बसायचे, आयत्या वेळेला कसे कच खायचे, याची अनेक उदाहरणे देऊन त्यावेळी यशवंतरावांवर टीका केली होती. प्रफुल्ल पटेल यांनी देखील तशीच पवारांवर आयत्यावेळी कच खाल्ल्याचीच टीका केली आहे.’
इंदिरा शरणागत यशवंतराव
1969 मध्ये सिंडिकेट – इंडिकेट काँग्रेसच्या वेळी यशवंतराव सुरुवातीला सिंडिकेट काँग्रेसच्या बाजूने होते. पण सिंडिकेट काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या संजीव रेड्डींविरुद्ध व्ही. व्ही. गिरी राष्ट्रपती पदी निवडून आल्यानंतर इंदिरा गांधी सिंडिकेट काँग्रेस मधल्या मंत्र्यांना हटवण्याची बातमी आल्याबरोबर यशवंतरावांनी इंदिरा गांधी पुढे शरणागती पत्करली. आपण आपला स्वाभिमान बाजूला ठेवून इंदिरा गांधींना पाठिंबा द्यायला तयार आहोत, असे त्यांनी मुंबईतल्या काँग्रेस मेळाव्यात जाहीर केले. त्यामुळे यशवंतरावांचे मंत्रीपद टिकले आणि नंतर ते 1977 पर्यंत कायम मंत्री राहिले. पण इंदिरा गांधींपुढे त्यांना कायम गप्प बसावे लागले, हा इतिहास आहे.
यशवंतरावांना सत्तेची वळचण कधीही सोडता आली नाही. 1978 मध्ये शरद पवारांचे बंड, त्याला यशवंतरावांचा छुपा आशीर्वाद, 1979 मध्ये चरणसिंगांबरोबर उपपंतप्रधान पद आणि 1980 मध्ये चव्हाण – रेड्डी काँग्रेसचे सर्वस्व गमावल्यानंतर पुन्हा एकदा इंदिरा गांधी पुढे शरणागती हा यशवंतरावांचा इतिहास राहिला आहे.
अजित पवारांचा “यशवंत मार्ग”
आज अजित पवारही त्याच मार्गाने गेले आहेत. 1980 मध्ये मी काँग्रेसच्या मुख्य प्रवाहाबरोबर जातो आहे, असे सांगून यशवंतराव इंदिरा काँग्रेसमध्ये निघून गेले. तेच अजित पवारांनी भाजप आता राजकारणाचा मुख्य प्रवाह आहे. मी त्यांच्याबरोबर जातो आहे, असे सांगून भाजपशी हातमिळवणी केली आहे. अजितदादांनी “यशवंत मार्गाने” भाजपच्या सत्तेची वळचण शोधली, पण शरद पवार मात्र प्रीतीसंगमावरल्या समाधीचे दर्शन घ्यायला गेले. ही 3 आणि 4 जुलै 2023 च्या राजकारणाची वस्तुस्थिती आहे.
Ajit pawar followed Y. B. Chavan lust for power way to join hands with BJP
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी फुटली; वसंतदादांच्या आत्म्याला चिरशांती मिळाली असेल; शालिनीताईंचा पवारांना टोला
- “केवळ महाराष्ट्रच नाही, तर उत्तर प्रदेशातही होऊ शकतो मोठा खेळ’’
- राष्ट्रवादीतल्या सिंडिकेट – इंडिकेट संघर्षात शरद पवारांना त्यांच्या गटाचे समर्थन जरूर, पण महाराष्ट्रात सहानुभूती का नाही??
- Land for Job Scam : तेजस्वी यादव यांच्या विरोधात CBI कडून आरोपपत्र दाखल!