नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या जाळ्यात अजितदादा अडकले; बाजीराव पेशव्यांना “कर्तृत्ववान” म्हणावे लागले!!, असे राजकीय नाट्य आज पुण्यात घडले.
पुणे महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांनी भाजपशी मैत्रीपूर्ण लढत न ठेवता भाजपवर टीका करायचा सपाटा लावला. त्यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर टीका करायची एकही संधी सोडली नाही. पण त्या पलीकडे जाऊन अजित पवारांनी त्यांचा अधिकार नसताना मोफत मेट्रो प्रवासाचे आश्वासन देऊन ते फसले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांची पिसे काढायची संधी मिळाली. त्यांनी सलग दोन-तीन दिवस अजितदादांच्या मोफत मेट्रो प्रवासाची पोलखोल केली. त्यामुळे अजितदादा पुण्यात “कॉर्नर” झाले.
– खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा!!
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना अत्यंत चतुराईने पण जोरदार टोला हाणला. शिवाजीनगर मध्ये घेतलेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की काही लोकं पुण्यात येऊन वाटेल ती आश्वासन देतात, पण त्यांचं कसं झालंय, पुण्यात एक म्हण आहे, “खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा”, अशी त्यांची अवस्था झाली आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना हाणला. तो अजित पवारांच्या पुरता जिव्हारी लागला.
– बाजीराव पेशव्यांचे कर्तृत्व करावे लागले मान्य
म्हणूनच अजित पवारांनी एक वाक्य सांगून मुख्यमंत्र्यांचा प्रतिवाद केला, पण प्रत्यक्षात ते मुख्यमंत्र्यांच्या जाळ्यात अडकले. मुख्यमंत्री मला “बाजीराव” म्हणाले, पण थोरले बाजीराव पेशवे कर्तृत्ववान होते. त्यांनी मनगटाच्या जोरावर कारभार केला, असे अजित पवार म्हणाले. किंबहुना बाजीराव म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांना जाळ्यात अडकवले होते. शेवटी अजित पवारांना बाजीराव पेशव्यांचे कर्तृत्व मान्य करावे लागले त्यांच्या मनगटात जोर होता, असे म्हणावे लागले.
– रोड शो मध्ये पुणेरी पगडी
एरवी याच अजित पवारांनी शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने मते मागितली, कायमच पेशवाई पासून अंतर राखले. शरद पवारांनी तर नेहमीच पेशवाईला टोमणे मारले. पेशवाईच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांना जातीवरून टोमणे मारले, पण पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रित रोड शो मध्ये अजित पवारांनी पुणेरी पगडी डोक्यावर घातली होती. त्यानंतर आज त्यांना बाजीराव पेशव्यांचे कर्तृत्व मान्य करावे लागले त्यांच्या मनगटात जोर होता, असे म्हणावे लागले.