नाशिक : एवढे “कडक” वागले, तरी अजितदादांची बदनामी, पण त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांची चाल चलन आणि चरित्र माहिती नाहीत का??, असे विचारायची वेळ खुद्द अजितदादांच्याच वक्तव्यातून आली. अजितदादांच्या राष्ट्रवादीचा मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे याने आपली सून वैष्णवी हगवणे हिचा अनन्वित छळ करून हुंडाबळी घेतला. त्यानंतर तो फरार झाला. त्याच्या कुटुंबातल्या तीन सदस्यांना पोलिसांनी अटक केली, पण तरी देखील अजून पोलीस त्याला अटक करू शकले नाहीत. वैष्णवी हगवणे प्रकरण उघडकीला येऊन साधारण आठवडा झाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र हगवणेला पक्षातून निलंबित केले.
पण याच राजेंद्र हगवणे याने त्याचा मुलगा शशांक हगवणे याच्या वैष्णवीशी झालेल्या लग्नात फॉर्च्युनर गाडी हुंड्यात घेतली होती आणि तिची चावी अजितदादांच्या हस्ते शशांकच्या हातात दिली होती. त्यावेळी अजितदादांनी ही गाडी बळजबरीने घेतली नाही ना??, असे विचारले होते. त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. मी एवढा कडक वागलो, तरी माझीच बदनामी झाली, असे अजितदादा आजच्या भाषणात म्हणाले.
वरवर पाहता अजितदादांचे हे म्हणणे खरे वाटते आणि खरे देखील आहे. पण जे अजितदादा 1991 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रमुख नेते म्हणून वावरत आहेत, त्यांना आपल्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांची चाल, चलन आणि चरित्र माहिती नाही का??, हा सवाल त्यांच्याच वक्तव्यातून समोर आला आहे.
शिवाय राजेंद्र हगवणे हे काही “असे” एकच प्रकरण नाही. अगदी नुकत्याच घडलेल्या बीड मधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील असाच मुद्दा समोर आला. संतोष देशमुखच्या हत्येत धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मीक कराड अडकला. पण त्याला पकडायला पोलिसांना किती वेळ लागला आणि कुणामुळे वेळ लागला?? त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला अजितदादांनी किती वेळ लावला??, या सगळ्या बाबी महाराष्ट्राच्या समोर उघड आहेत.
- मुंडे + कराड + टिंगरे
वाल्मीक कराड + धनंजय मुंडे या जोडगोळीमुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीची बदनामी झाली. त्यानंतर राजेंद्र हगवणे प्रकरणात देखील अजितदादांचीच राष्ट्रवादी फसली. त्याआधी पोर्शे कार प्रकरणात आमदार सुनील टिंगरे याला वाचवायला गेल्यामुळे अजितदादांच्याच राष्ट्रवादीला बदनामीला सामोरे जावे लागले. पण हे सगळे का घडले??, तर अजितदादांनी संबंधितांवर योग्य वेळेत आणि सुरुवातीलाच कठोर कारवाई केली नाही म्हणून घडले.
वाल्मीक कराड + धनंजय मुंडे प्रकरणात अजितदादा ओबीसी मतांचा हिशेब करत बसले. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले, तर ओबीसी समाजात फार “वाईट मेसेज” जाईल असा स्वतःचा समज करून राहिले. त्यात त्यांनी वेगवेगळे राजकीय आणि सामाजिक हिशेब मांडले, पण यातून अजितदादांच्या हाती सकारात्मक काही लागले नाही, उलट धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावाच लागला. पण दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीला आणि त्यामुळे फडणवीस सरकारला बदनामी मात्र सहन करावी लागली. तसेच राजेंद्र हगवणे प्रकरणात घडत चालले असताना अजितदादांनी थोडी उशिरा कारवाई केली. त्यामुळे त्यांना जी बदनामी सहन करावी लागली, त्याला कारणीभूत त्यांनीच पोसलेले नेते ठरले, इतर कुणी नाही, हे इथे लक्षात घेतले पाहिजे
वास्तविक धनंजय मुंडे काय वाल्मीक कराड काय किंवा अगदी राजेंद्र हगवणे काय यांची चाल, चलन आणि चरित्र अजितदादांना आधी माहिती नव्हते, असे अजिबात समजायचे कारण नाही. मध्यंतरी शरद पवारांनी एक मुलाखत देऊन धनंजय मुंडे यांना कुठल्या कुठल्या प्रकरणातून कसे वाचवले, हे आमचे आम्हाला माहिती, असे म्हणून धनंजय मुंडे यांच्या चाल, चलन आणि चरित्राकडे अंगुलीनिर्देश केला होता. त्यामुळे खरंतर अजितदादांनी धनंजय मुंडे, वाल्मीक कराड, राजेंद्र हगवणे आणि त्याआधी सुनील टिंगरे यांच्यावर योग्य वेळीच कठोर कारवाई करायला हवी होती. त्यासाठी राजकीय आणि सामाजिक हिशेब मांडत बसण्याची गरज नव्हती. त्यांनी योग्य वेळेत कारवाई केली नाही म्हणून त्यांची बदनामी झाली किंबहुना त्यांना ती सहन करावी लागली.
त्यामुळे मी एवढा कडक वागलो, तरी माझीच बदनामी होते, असे अजितदादांचे वाक्य त्यांच्या समर्थकांसाठी टाळ्यांचे असले, तरी त्या वाक्यात फारसे तथ्य नाही. अजितदादांची कृती त्या वाक्यानुसार घडलेली दिसत नाही.
Ajit Pawar claims his defamation in vaishnavi hagavane dowry case
महत्वाच्या बातम्या
- असीम मुनीरची “फील्ड मार्शली”, सिंधच्या आगीत जळून गेली!!
- Justice BR Gavai : ‘वकील सुट्टीच्या दिवशी काम करू इच्छित नाहीत, पण खटल्यांच्या प्रलंबिततेसाठी…’’
- Sonia and Rahul Gandhi : सोनिया अन् राहुल गांधींनी गुन्ह्यातून १४२ कोटी रुपये कमावले – EDचा न्यायालयात दावा!
- Morgan Stanley : मॉर्गन स्टॅनलीने भारताच्या विकासदराचा अंदाज वाढवला