करोना परिस्थितीमुळे कौटुंबिक न्यायालयात मोठ्या कालावधीपासून बंद असलेली पालक आणि मुलांची भेट सुरू झाली आहे. After corona period Family court allow the parents and child meeting in court premises
विशेष प्रतिनिधी-
पुणे : करोना परिस्थितीमुळे कौटुंबिक न्यायालयात मोठ्या कालावधीपासून बंद असलेली पालक आणि मुलांची भेट सुरू झाली आहे. दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी नेहमीप्रमाणे कौटुंबिक न्यायालयातील बाळ भेटीचे संकुल सुरू राहणार आहे. याबाबत कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी आदेश काढला आहे. उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र शासनाने करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केलेल्या नियमाचे पालन करून हे संकुल सुरू राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला जातो. त्यावेळी मुलगा एका पालकाकडे असतो. तर दुसऱ्या पालकाला मुलाची भेट घेण्यची इच्छा असते. अशा पालकांना मुलाची भेट घेण्यास परवानगी न्यायालय देत असते. ही भेट बाळ भेट संकुल येथे होत असते. मात्र, करोना परिस्थितीचा परिणाम न्यायालयीन कामकाजावर झाला होता. त्यावेळी कामकाजावर निर्बंध लादण्यात आले होते. फेब्रुवारीमध्ये न्यायालयाचे कामकाज पूर्ण वेळेत सुरू झाले आहे. आता बाळ भेटीचे संकुलही सुरू झाले आहे. येथे संकुल सुरू नसल्याने एका पालकाकडून दुसऱ्या पालकाला भेटण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप काही पालकांकडून करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर हा निर्णय फायदेशीर असणार आहे.
हा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे पालक आणि मुलांच्या भेटीचा प्रश्न सुटला आहे. कौटुंबिक न्यायालयातच पालक आणि मुलांच्या भेटी होतील. आता कौटुंबिक न्यायालयाच्या कामकाजावरील सर्व निर्बंध हटले असून, पूर्णपणे पूर्वीप्रमाणे काम सुरू झाले आहे.
ऍड. वैशाली चांदणे, अध्यक्ष, दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, पुणे.