छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा नाकारून शिवसेनेने दीर्घकालीन राजकारणासाठी आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे??, हा भाग सध्या अलहिदा!! पण छत्रपती संभाजीराजे यांच्या “अपक्ष” उमेदवारीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने टाकलेल्या जाळ्यात मात्र शिवसेना अडकली नाही, हीच आजची राजकीय वस्तूस्थिती आहे!! After a long period of politics, Shiv Sena did not fall into the trap of NCP
छत्रपती संभाजीराजे यांनी स्वतःच्या “अपक्ष” उमेदवारीची घोषणा केली असली आणि स्वराज्य संघटना स्थापन केली असली तरी त्यांचा मूलभूत राजकीय कल राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिल्याचे लपून राहिलेले नाही. त्यामुळे ते “अपक्ष” उमेदवार म्हणून शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडून आले असते तरी राज्यसभेत त्यांनी शिवसेनेला अनुकूल अशीच भूमिका घेतली असती याची कोणतीही खात्री देता येत नाही.
– ठाकरे – पवार शब्द देवाण-घेवाण
त्यामुळे ठाकरे – पवारांच्या शब्द देवाणघेवाणीत जरी 2022 च्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या 2 उमेदवारांना राज्यसभेवर निवडून देण्याचा शब्द शरद पवारांनी दिला असला तरी अपक्ष उमेदवारीच्या निमित्ताने संभाजी राजे हे प्रत्यक्षातले राष्ट्रवादीचेच समर्थक नेते शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून गेले असते इथेच खरी “राजकीय मेख” आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची राजकीय चतुराई वेगळीच ओळखून आक्रमक भूमिका घेतली आहे.
– संभाजीराजेंचा राष्ट्रवादीकडे कल
शिवसेनेला आपला कट्टर शिवसैनिक राज्यसभेवर पाठवायचा आहे. संजय राऊत यांच्या आजच्या वक्तव्यातून ही बाब प्रामुख्याने अधोरेखित होताना दिसते आहे. शिवसेनेचे 2 उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले आहे. “अपक्ष” उमेदवाराला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही मग ते कोणीही असो. हे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने सांगतो आहे, असे स्पष्ट उद्गार संजय राऊत यांनी काढल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेविषयी शंका उरलेली नाही. पण संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीच्या निमित्ताने गेल्यावेळी सारखेच राष्ट्रवादीचे 2 उमेदवार राज्यसभेत पाठवण्याचा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा मनसूबा मात्र यानिमित्ताने बाजूला पडला आहे.
2 राष्ट्रवादीचे, मग शिवसेनेचे 2 का नकोत?
संभाजीराजे इथून पुढे नेमकी काय खेळी करतील??, स्वतः निवडून येण्यासाठी भाजपच्या 22 मतांसह उर्वरित लागणारी 15 मतांची बेगमी ते स्वतंत्रपणे करू शकतील का??, हा प्रश्न आहे. शिवसेनेची अथवा राष्ट्रवादीची मते फोडणे इतके सोपे नाही. भविष्यकाळातील जातीय गणितांवर डोळा ठेवून शिवसेना सध्या राजकीय खेळी खेळली नाही हे खरे, पण भविष्यकाळातील जातीय गणिते बदलूही शकतात. काही विशिष्ट निर्णय घेतले तर मराठा आणि ओबीसी समाज शिवसेनेच्या विरोधात जाणार नाहीत. त्यामुळे भविष्यकालीन परिणामांचा विचार करून आत्ता राज्यसभेची हक्काची एक जादा जागा गमावण्यात मतलब काय??, असा शिवसेना नेतृत्वाने विचार केला असेल तर तो गैर मानता येणार नाही.
– प्युअर शिवसैनिकाला संधी
2 वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वतःचे शरद पवार आणि फौजिया खान असे खासदार शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडून आणले होते. आता जर शिवसेनेने राष्ट्रवादीकडे पाठिंब्याची अपेक्षा धरली असेल आणि प्युअर शिवसैनिकाला राज्यसभेची संधी देणार असेल तर त्यात अजिबात गैर मानता येणार नाही.
संभाजीराजे यांच्या “अपक्ष” उमेदवारीच्या निमित्ताने राष्ट्रवादी वेगळी खेळी करून शिवसेनेलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत होती. पण शिवसेनेने या चलाखीच्या खेळीचा नीट विचार करून राष्ट्रवादीवर मात केली आहे, ही आजची राजकीय वस्तुस्थिती आहे.