विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील तळजाई टेकडीच्या पठारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भरवलेल्या ‘प्रांतिक शिबिरा’ला शनिवारी 14 जानेवारी) 40 वर्षे पूर्ण होत आहेत. तळजाईच्या पठारावर दोनशे एकर जागेवर हे शिबिर उभारण्यात आले होते आणि 14, 15, 16 जानेवारी 1983 असे 3 दिवस चाललेल्या या शिबिरात तब्बल पस्तीस हजार संघस्वयंसेवकांची उपस्थिती होती. शिबिराला चाळीस वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने स्वयंसेवकांकडून या शिबिराच्या आठवणी जागवल्या जाणार आहेत. 40 Years of Taljai Camp of 35000 Sangh Swayamsevaks
पुणे शहर, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, गोवा, संभाजीनगर, मराठवाडा, नाशिक आणि खान्देश या भागातील 2240 गावांमधून या शिबिरासाठी संघस्वयंसेवक आले होते. शिबिराच्या उभारणीसाठी शेकडो स्वयंसेवक तळजाईच्या पठारावर दोन महिने रात्रंदिवस राबत होते. शिबिराला आलेल्या स्वयंसेवकांसाठी छत्तीस स्वयंपूर्ण नगरे उभारण्यात आली होती. एका नगरात एक हजार स्वयंसेवकांची निवास, भोजन आदी सर्व व्यवस्था होती, अशी माहिती संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी शुक्रवारी दिली.
संक्रांतीच्या निमित्ताने शिबिराला आलेल्या सर्वांना गुळाच्या पोळ्यांचे भोजन देण्यात आले होते. या गुळाच्या पोळ्या पुण्यातील घराघरांमधून संकलित करण्यात आल्या होत्या. या उपक्रमाला पुणेकर माता – भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता आणि सुमारे पावणेदोन लाख गुळाच्या पोळ्या शहरातून संकलित झाल्या होत्या, असेही डॉ. दबडघाव यांनी सांगितले.
संघाच्या कार्याचे आणि संघाकडून चालवल्या जाणाऱ्या सेवाकार्यांचे दर्शन घडवणारे 400 चित्रांचे ‘संघदर्शन’ हे प्रदर्शन, शिवधनुष्याच्या आकाराचे प्रवेशद्वार, पृथ्वीच्या आकाराचे आणि त्यावर शेषशाही नागाने फणा धरलेले दोन मजली भव्य व्यासपीठ ही या शिबिराची आकर्षणे ठरली होती. ‘संघदर्शन’ प्रदर्शनाला तीन दिवसात तीन लाख नागरिकांनी भेट दिली होती, अशीही माहिती डॉ. दबडघाव यांनी दिली.
तत्कालीन सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस यांच्यासह संघाचे सरकार्यवाह रज्जूभैया, प्रचार प्रमुख मोरोपंत पिंगळे यांच्यासह अनेक केंद्रीय अधिकारी या शिबिरात उपस्थित होते आणि शिबिरात 14 जानेवारी रोजी झालेल्या मकरसंक्रमण उत्सवाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक, ‘स्वामी’कार रणजित देसाई यांची उपस्थिती होती. डॉ. अरविंद लेले यांनी लिहिलेले ‘हिंदू सारा एक…’ हे गीत या शिबिरात स्वयंसेवकांनी एकसुरात गायले. विख्यात संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांनी ते व्यासपीठावरून गायले होते आणि प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांनी हे गीत स्वरबद्ध केले होते.
शिबिराच्या निमित्ताने पुण्यातून 16 जानेवारी रोजी दोन भव्य पथसंचलने काढण्यात आली होती. या संचलनांचेही शहरात जागोजागी स्वागत करण्यात आले होते. या शिबिराला 40 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुण्यातील स्वयंसेवकांकडून या शिबिराच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. शिबिराची संपूर्ण माहिती देणारी एक फिल्मही तयार करण्यात आली असून ती समाज माध्यमातून प्रसारित करण्यात येत असल्याचे डॉ. दबडघाव यांनी सांगितले.
40 Years of Taljai Camp of 35000 Sangh Swayamsevaks
महत्वाच्या बातम्या