विशेष प्रतिनिधी
नागपूर : सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे हजारो एकर जमीन असल्याप्रकरणी सोशल मीडियावर चुकीची माहिती दिल्याप्रकरणी नागपूरच्या कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार हेक्टर आणि आर मोजण्यात गल्लत झाल्यामुळे झाल्याचा दावा केला जात आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे तब्बल 1147 एकर जमीन असल्याचा आरोप रामेश्वर दरेकर नामक व्यक्तीने एका फेसबूक पोस्टद्वारे केला होता. यामुळे एकच खळबळ माजली होती. ही पोस्ट राज्यात चांगलीच व्हायरल झाली होती. त्यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. परिणामी, बावनकुळे कुटुंबीयांविषयी समाजात चुकीची प्रतिमा निर्मिती झाली होती. अखेर या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा कोराडी पोलिस ठाण्यात रामेश्वर दरेकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 78 (1) (ii) आणि 356 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदाराने काय केला दावा?
निखिल रामचंद्र इंगळे यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुकवर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये रामेश्वर दरेकर याने महसूल मंत्री बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर 1147 एकर जमीन असल्याचा दावा केला होता. हा व्हिडिओ 31 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला. या दाव्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊन बावनकुळे कुटुंबाची बदनामी झाली, असे निखिल इंगळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या नेतृत्वात तपास सुरू केला आहे.
तहसीलदार, कामठी कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत प्रमाणपत्रानुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर एकूण जमीन केवळ 28.44 एकर आहे. ही जमीन विविध गावे व सर्वे क्रमांकांमध्ये नोंद आहे. परिणामी, 1147 एकरचा दावा पूर्णपणे चुकीचा व दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेक्टर आणि आर मोजण्यात गल्लत झाल्याने झाली गफलत
दुसरीकडे, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हेक्टर व आर मोजण्यात गल्लत झाल्यामु्ळे हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे हजारो एकर जमीन असल्याबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी अखेर कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं तर या संदर्भात हेक्टर आणि आर मोजण्यात काहीतरी गल्लत झाली असावी असे सकृतदर्शनी वाटते. चुकून आर ऐवजी हेक्टर वाचल्याने हे घडले असावे, असे विजय कुंभार यांनी म्हटले आहे.
28.44 Acres, Not 1147: FIR Filed Over Viral Fake News on Bawankule’s Land
महत्वाच्या बातम्या
- शिवछत्रपतींनी उभारलेले किल्ले संस्कृतीचे चैतन्यमय तीर्थाटन; खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदींचे प्रतिपादन
- Raghav Chadha : आप ने राघव-चड्ढा यांना राज्यसभेतून उपनेता पदावरून हटवले; चार वर्षांपासून खासदार
- Amit Shah : शहा म्हणाले- 15 दिवस बंगालमध्ये राहणार; ममतांना त्यांच्याच घरात हरवायचे आहे, TMCला खाडीत फेका
- विधानसभेच्या पोटनिवडणुकीत बारामती मध्ये काँग्रेसला राजकीय पुनरुज्जीवनाची संधी!!