विशेष प्रतिनिधी
जीनिव्हा : जगात सर्वत्र कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. तसेच, दर आठवड्याला आढळणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या दोन महिन्यांमध्ये दुप्पट झाली असल्याचेही या संघटनेने म्हटले आहे.WHO worried due to rising corona ceases
‘डब्लूएचओ’चे महासंचालक टेड्रॉस अधनोम घेब्रेयेसूस पत्रकार परिषदेत म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी रुग्णवाढीचा वेग अधिक आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात बऱ्यापैकी यश मिळविलेल्या देशांमध्येही आता या विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे.
पापुआ न्यू गिनी या देशात जानेवारीपर्यंत केवळ ९०० रुग्णांची नोंद झाली होती आणि ९ जणांचा मृत्यू झाला होता. आता मात्र येथे नऊ हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणूनच लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असून अधिकाधिक लोकांनी सरकारी धोरणानुसार तातडीने लस घ्यावी.’’
ब्रिटनमध्ये अत्यंत संसर्गक्षम असलेला ‘बी.१.६१७’ कोरोना स्ट्रेन असलेले ७७ नमुने आढळले आहेत. या प्रकारचा स्ट्रेन सर्वप्रथम भारतात आढळून आला होता. कोरोना विषाणूच्या या प्रकारावर सध्या अभ्यास सुरु आहे.