विशेष प्रतिनिधी
काबूल : अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानमधून मायदेशी परतू लागल्यानंतर तेथे तालिबान ही दहशतवादी संघटना पुन्हा सक्रीय झाली असून देशात पुन्हा त्यांचे कायदे आणण्याचा प्रयत्न होत आहे. या संघटनेच्या नियंत्रणाखालील देशाच्या पूर्वोत्तर तखार या प्रांतात महिलांना एकट्याने बाहेर पडण्यास मज्जाव केला आहे तर पुरषांना दाढी राखणे अनिवार्य केले आहे.Taliban active in Afghanistan once again
पाकिस्तानच्या ‘द न्यूज’ या दैनिकाने मानवाधिकार कार्यकर्त्यांचा हवाला देत सांगितले आहे की, तालिबानने मुलींसाठी हुंडा देण्याचा नियम केला आहे. पुरुषांविना घराबाहेर न पडण्याचे निर्देश महिलांना दिले आहेत. तखार प्रादेशिक परिषदेच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तानमधील ज्या भागांवर तालिबानने ताबा घेतला आहे
तेथे अन्नपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तेथे राहणे अवघड झाले असून रुग्णालये व शाळा बंद आहेत. सरकारी इमारती नष्ट करण्यास तालिबान्यांनी सुरुवात केली आहे. तालिबानने मात्र या सर्व गोष्टी फेटाळून लावल्या आहेत. हा तालिबान्यांविरोधात दुष्प्रचार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान अफगाणिस्तानमधील बगराम हवाई तळ अमेरिकी सैन्याने सोडला आहे. गेल्या २० वर्षांपासून या तळावर अमेरिकेचे सैनिक तैनात होते. अफगाणिस्तानमधील युद्धात तालिबान आणि अल-काईदाविरोधात कारवायांचे हे प्रमुख स्थान होते.