वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : Trump-Putin अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेची परराष्ट्र धोरण अधिक आक्रमक झाली आहे. हुती बंडखोरांपासून हिजबुल्लाह आणि हमासपर्यंत, पश्चिम आशियातील अमेरिकेचा दृष्टिकोन अधिक कठोर झाला आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वीच रशियासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा पुरस्कार केला होता आणि आता हे संबंध इराणसाठी समस्या बनले आहेत.रशिया आणि इराण यांचे जुने संबंध आहेत, परंतु अलीकडेच ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील चर्चेनंतर परिस्थिती बदलली आहे.Trump-Putin
याशिवाय, पश्चिम आशिया आणि हिंद महासागरातील अमेरिकेच्या लष्करी जमावामुळेही इराणची चिंता वाढली आहे. अमेरिकेने आपल्या दोन युद्धनौका (यूएसएस हॅरी एस ट्रूमन कॅरियर एअरक्राफ्ट) अरबी समुद्रात तैनात करण्याची घोषणा केली आहे. तसेच ५ बी-२स्टेल्थ बॉम्बर्स ब्रिटिश सैन्य तळ डिएगो गार्सियामध्ये तैनात करण्याची योजना आहे. याशिवाय, सी-१७ मालवाहक विमानांद्वारे मोठ्या प्रमाणात शस्त्रे, लष्करी उपकरणे आणि रसद सामग्री पाठवली जात आहे.
अमेरिकेचे हुती बंडखोरांच्या ४० ठिकाणांवर बॉम्बहल्ले
अमेरिकेने येमेनमधील हूती बंडखोरांच्या ठिकाणांवर पुन्हा हवाई हल्ला केला. शुक्रवारी पहाटेच्या हल्ल्यांमध्ये सना येथील निवासी भागांसह हूती बंडखोरांच्या ४० ठिकाणांवर अमेरिकेने बॉम्बवर्षाव केला आहे. १९ पेक्षा जास्त क्षेपणास्त्र हल्ले अमरानमध्ये झाले. यात सना आंतरराष्ट्रीय विमानतळालाही लक्ष्य केले. घटनेत १० जणांचा मृत्यू आणि १००जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
हिजबुल्लाहच्या ड्रोन ठिकाणांवर इस्रायली हल्ले
इस्रायलने दाहिया येथे शुक्रवारी हवाई हल्ला केला, जो नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या युद्धबंदीनंतर पहिला हल्ला आहे. हे क्षेत्र हिजबुल्लाहचा बालेकिल्ला मानला जातो. इस्रायलचा दावा आहे की त्यांनी दाहिया येथे हिजबुल्लाच्या ड्रोन स्टोरेज सुविधेला लक्ष्य केले. हल्ल्यांमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आणि १८ जण जखमी झाले. त्यात महिला व मुलांचा समावेश आहे.
इराणची अंतर्गत स्थिती… आर्थिक संकट, हमास-हिजबुुल्लाह दुबळे झाल्याने खामेनीसाठी चिंता
इराणची स्थिती नाजूक होत आहे. गेल्या दोन वर्षांत इस्रायलने हमास आणि हिजबुल्लाहला मोठे नुकसान पोहोचवले आहे, ज्यामुळे दोन्ही संघटना विखुरल्या आहेत. त्यामुळे इराणचा प्रतिकार जवळपास विखुरला आहे. यासोबतच निर्बंध आणि इतर कारणांमुळे इराण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. येथे महागाई दर ३५% पेक्षा जास्त आहे. कच्च्या तेलाची उपलब्धता असूनही सरकारला दोन-दोन तास वीज कपात लागू करावी लागली आहे. इराण दीर्घकाळापासून दुष्काळाचा सामना करत आहे, ज्यामुळे पाण्याची मोठी टंचाई होत आहे. या कारणांमुळे इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी आणि इराणी राष्ट्राध्यक्ष महमूद पेजेश्कियान यांच्या विरोधात जनतेचा रोष वाढत आहे.