वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये आज झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आसिफ अली झरदारी विजयी झाले आहेत. झरदारी यांनी इम्रान खान यांच्या उमेदवाराचा 230 मतांनी पराभव केला. झरदारी यांना 411 मते मिळाली, तर इम्रान खान यांच्या उमेदवाराला केवळ 118 मते मिळाली. नवाज यांचा पक्ष पीएमएल-एन आणि बिलावलचा पक्ष पीपीपी यांनी मिळून आसिफ अली झरदारी यांना उमेदवारी दिली. 2008 मध्येही ते राष्ट्रपती बनले होते.Asif Ali Zardari 14th President of Pakistan; Imran’s candidate lost by 230 votes
तर इम्रान समर्थक SIC पक्षाने महमूद खान अचकझाई यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान सुरू असताना पाकिस्तान नॅशनल असेंब्लीच्या काही सदस्यांनी इम्रान खान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. मात्र, झरदारी राष्ट्रपती होणार हे आधीच निश्चित मानले जात होते.
झरदारींना पाच पक्षांचा पाठिंबा
झरदारींना त्यांचा स्वतःचा पक्ष पीपीपी व्यतिरिक्त पीएमएल-एन, एमक्यूएम-पी, बीएपी, आयपीपी या नॅशनल असेंब्लीतील सर्वात मोठा पक्ष अशा अनेक पक्षांचा पाठिंबा होता. त्याच वेळी, मौलाना फजल-उर-रेहमान यांच्या JUI-F पक्षाने सार्वत्रिक निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करत संसदेशी संबंधित सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकला आहे. अशा स्थितीत त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेतला नाही.
पाकिस्तानमधील पंतप्रधानांप्रमाणेच राष्ट्रपती होण्यासाठी उमेदवार मुस्लिम असणे आवश्यक आहे. निवडणुकीसाठी सकाळी साडेदहा वाजता मतदानाला सुरुवात झाली, ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत सुरू होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी गुप्त मतपत्रिकेद्वारे मतदान झाले.
पाकिस्तानी मीडिया द डॉनने दिलेल्या माहितीनुसार, नवे राष्ट्रपती रविवारी शपथ घेणार आहेत. याआधी शुक्रवारी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन पदावरून निरोप देण्यात आला.