विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्थलांतरित मजूर, देशभरात लॉकडाऊनमुळे अडकलेले यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी, आणि अन्य लोकांना आपापल्या गावी जाण्याची सशर्त परवानगी दिल्यानंतर त्यांच्या वाहतुकीसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगी नंतर रेल्वेने या संबंधीची सूचना जारी केली. रेल्वेने आवश्यक तेथे नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून ते राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधून विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची व्यवस्था करतील. या वाहतुकीच्या वेळी केंद्र सरकारने जारी केलेल्या सर्व सूचनांचे पालन करून प्रवाशांची सोय करायची आहे.
रेल्वे तिकीट बुकिंग, प्लँटफॉर्म, रेल्वेगाड्यांमध्ये सोशल डिस्टंसिंगसह आरोग्य मंत्रालयाने जारी केलेले प्रोटोकॉल पाळायचे आहेत. विशेष रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक ठरवताना रेल्वे स्टेशनवर एकाच वेळी गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचनाही गृह मंत्रालय व रेल्वे मंत्रालय यांनी केली आहे. तिकीट बुकिंगबाबतच्या सूचना वेळोवेळी जारी करण्यात येतील.