प्रतिनिधी
पुणे : आपल्या गावी पोहोचण्यासाठी अत्यंत हलाखीच्या अवस्थेत पायी निघालेल्या स्थलांतरीत मजुरांच्या अनेक कहाण्या डोळ्यांत पाणी आणत आहेत. रेल्वे कोणत्याही जिल्ह्यातून श्रमिक विशेष ट्रेन चालविण्यास तयार असल्याचे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे. मात्र, राज्यांनाच त्याबाबत नियोजन करता येत नसल्याचे दिसून येत आहे.
देशातील सर्वच भागांतून सध्या स्थलांतरीत मजुरांचे लोंढे आपल्या गावाकडे जाताना दिसत आहेत. त्यांची खाण्या-पिण्याची व्यवस्था नाही. मात्र, तरीही फार मोठ्या संख्येने रेल्वे सुरू नाहीत.
याबाबत गोयल म्हणाले, अडकलेल्या मजूर आणि कामगारांसाठी आता कुठल्याही जिल्ह्यातून श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यास रेल्वे तयार आहे. जिल्हाधिकार्यांनी अडकलेल्या मजुरांची यादी आणि त्यांच्या ठिकाणांची माहिती परवानगीसाठी राज्याच्या संबंधित अधिकार्यांकडे द्यावी.
संबंधित अधिकार्यांनी आणि यंत्रणांनी अडकून पडलेल्या मजुरांची यादी आणि त्यांना पोहोचवण्याचे ठिकाणाची यादी तयार करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत. रेल्वेने १५ मेपर्यंत १०४७ श्रमिक विशेष ट्रेन विविध राज्यांमधून चालवल्या आहेत. या विशेष ट्रेनद्वारे १४ लाख मजूर आणि कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यात आले आहे.
मात्र, मजुरांना रेल्वेने सोडण्यापूर्वी अनेक गोष्टींची तयारी करावी लागत असल्याने अनेक राज्य सरकारे त्यासाठी टाळटाळ करत आहेत. महाराष्ट्र सरकारने राज्य परिवहन मंडळाच्या एसटीने राज्याच्या सीमेपर्यंत मजुरांना सोडले आहे. मात्र, त्यापुढची व्यवस्था केलेली नाही. त्यांच्यासाठी रेल्वेचाच पर्याय सोपा ठरला असता.