विशेष प्रतिनिधी
मुंबई : विशाखापट्टणम नौदल तळावर हेरगिरी करून तेथील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविणारा मुख्य हेर महंमद हरून अब्दुल रहमान लकडावाला याला एनआयएने मुंबईतून अटक केली.
विशाखापट्टणम नौदल तळावरील काही अधिकाऱ्यांना फितवून लकडावाला याने तेथील गोपनीय माहिती पाकिस्तानी नौदलाला दिली होती. यात हनी ट्रँपचा देखील वापर केला गेला होता. या माहितीच्या आधारे नौदल तळांवर दहशतवादी हल्ले करण्याचे कारस्थानही नंतर उघड झाले होते.
यात लकडावाला सामील होता. एनआयएने केलेल्या तपासात लकडावाला याने कराचीला भेट देऊन तेथील नौदल अधिकाऱ्यांना भेटल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता पण तो सापडू शकला नाही. शेवटी एनआयएने खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे लकडावाला याला मुंबईतूनच अटक केली. त्याच्या पुढील तपासातून आणि चौकशीतून अधिक धक्कादायक माहिती पुढे येऊ शकते, असे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले.