महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष निर्णय प्रक्रियेत नसल्याने त्याबद्दल मला काही विचारू नका, असे म्हणून राजकीय भूकंप घडविणारे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांना आता उपरती झाली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरे यांचीही समजूत काढली.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष निर्णय प्रक्रियेत नसल्याने त्याबद्दल मला काही विचारू नका, असे म्हणून राजकीय भूकंप घडविणारे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांना आता उपरती झाली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरे यांचीही समजूत काढली.
राहूल गांधी यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांकडून टीका झाली होती. परंतु, कॉंग्रेसमधील अनेक जण नाराज झाले होते. कॉंग्रेसमधील अनेक मंत्र्यांना आपल्या मंत्रीपदाबाबत धास्ती निर्माण झाली होती. त्यामुळे कॉंग्रेसमधूनच त्यांच्यावर दबाव आणण्यात आला होता. विशेष म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यास राहूल गांधी यांचा विरोध होता. परंतु, कॉंग्रेसच्या आमदारांचा मोठा गट बाहेर पडण्याच्या धास्तीने हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडीमध्ये जाण्याचे ठरविले. तेव्हापासून राहूल गांंधी नाराज आहेत.
त्यांची नाराजी चीनी व्हायरसच्या संकटात महाराष्ट्र सरकारकडून होत असलेल्या गलथानपणामुळे बाहेर पडली. परंतु, कॉंग्रेस संघटनेकडून नाराजी व्यक्त झाल्यावर त्यांना उपरती झाली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर शिवसेना नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस पक्ष असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले.
आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, प्रथमच राष्ट्रीय पक्ष म्हणविणाऱ्या कॉंग्रेसला शिवसेना नेत्यांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ आल्यामुळे कॉंग्रेसमधील एक गट चांगलाच नाराज झाला आहे.