महाराष्ट्रात निर्णयाचा अधिकार नाही पण राजस्थान, छत्तीसगड, पंजाबमध्ये जबाबदारी आमची आहे, असे म्हणणाऱ्या राहूल गांधींना केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सुनावले आहे. तुमचे मुख्यमंत्री तरी तुमचे ऐकतात का? असा सवाल प्रसाद यांनी केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रात निर्णयाचा अधिकार नाही पण राजस्थान, छत्तीसगड, पंजाबमध्ये आम्ही जबाबदार आहोत, असे म्हणणाऱ्या राहूल गांधींना केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सुनावले आहे. तुमचे मुख्यमंत्री तरी तुमचे ऐकतात का? असा सवाल केला आहे.
कॉंग्रसेचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लॉकडाउन अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. यावर रविशंकर प्रसाद म्हणाले, पंजाब आणि राजस्थान यांनी सर्वात प्रथम लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातही ३१ मे पर्यंत मुदत वाढविण्यात आली. याचा अर्थ तुमचेच मुख्यमंत्री तुमचे ऐकत नाहीत, असा होतो.
राहुल गांधी यांचे लॉकडाउनबाबतचे विधान अत्यंत चुकीचे आहे. ते खोटी माहिती पसरवत आहेत. लॉकडाऊन पाळून चीनी व्हायरसला रोखणाऱ्या जनतेचा अपमान करत आहेत, असे सांगून रविशंकर प्रसाद म्हणाले, जगातील करोनाग्रस्त १५ देशांची एकूण लोकसंख्या १४२ कोटी आहे, तर भारताची लोकसंख्या १३७ कोटी आहे. या पंधरा देशांमध्ये ३ लाख 43 हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत. परंतु, आपल्या देशात जवळपास ४ हजाराच्या आसपास मृत्यू झाले आहेत. चीनी व्हायरसवर सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे लॉकडाउन हा एकच तोडगा आहे.
मात्र, राहुल गांधी चीनी व्हायरसविरुध्द लढणाऱ्या जनतेची उमेद कमी करत आहेत. राहुल गांधी निवडणुकांमध्ये नीरव मोदींबद्दल बोलत होते. पण त्यांचे सहकारी लंडनमध्ये नीरव मोदी यांना मदत करत आहेत. भिलवाडा मॉडेलचे श्रेय राहुल गांधी यांना देण्यात आले होते, पण तेथील सरपंच म्हणतात की हे काम तेथील लोकांचे आहे. केरळमधील वायनाडच्या मॉडेलचे आरोग्य मंत्रालयाने कौतुक केले आहे. पण वायनाडला आरोग्य मंत्रालयाचा हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे, असेही प्रसाद यांनी सांगितले.
राहूल गांधी ज्या न्याय योजनेबाबत बोलत आहेत ती त्यांनी प्रथम काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यांत लागू करावी, अशी मागणीही प्रसाद यांनी केली.