भारताचा ‘जीडीपी’ सध्या दोनशे लाख कोटी रूपये असला तरी चीनी व्हायरसच्या संकटामुळे वाढीचा दर २.५ टक्के ते अगदी शून्य टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो, असा अंदाज विविध पतमानांकन संस्थांचा आहे. ‘मूडीज’ने शून्य टक्के, तर ‘एस अँड पी’ने १.८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याउलट जागतिक बँकेने १.८ ते २.५ टक्क्यांदरम्यान, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने १.९ टक्के दर राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. मार्च २०२०अखेरीस विकासदर ४.९ टक्क्यांच्या आसपास होता.
विशेष प्रतिनिधी
पुणे : ढोबळ देशांतर्गंत उत्पादनाचा (जीडीपी) संदर्भ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या सुमारे २० लाख कोटी रूपयांच्या पॅकेजवरून केलेल्या टिप्पणीवरून ज्येष्ठ विचारवंत डाॅ हरी नरके सोशल मीडियावर ट्रोल झाले. “राहुल गांधीसुद्धा असे विधान करणार नाही,” असा खोचक शेरा एका ट्िवटरकर्त्याने मारला आहे.
मोदी यांनी चीनी व्हायरसच्या संकटाशी हात करण्यासाठी व अर्थव्यवस्थेमध्ये जान फुंकण्यासाठी २० लाख कोटी रूपयांचे आत्मनिर्भर भारत योजना जाहीर केली. हे पॅकेज भारताच्या जीडीपीच्या सुमारे दहा टक्के असेल, असेही ते म्हणाले. त्यावर टिप्पणी करताना डाॅ. नरके यांनी लिहले, की
“भारताचा या वर्षीचा जीडीपी शून्य टक्के असणार आहे : पतमानांकन संस्था.
त्याच्या दहा टक्के म्हणजे मोठं शून्यच की!”
नरके यांनी हे ट्विट करताच एकाने त्यांच्या नजरेस आणून दिले, “जीडीपी आणि जीडीपी वाढीचा दर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.” दुसरयाने लिहिले, “जीडीपी वाढीचा दर शून्य टक्के होऊ शकतो; जीडीपी नाही. जीडीपी वाढीचा दर म्हणजे मागील वर्षाच्या जीडीपीपेक्षा या वर्षी जीडीपीमध्ये किती वाढ झाली तो दर…” आणखी एकाने लिहिले, “ज्यावर्षी जीडीपी शून्य असतो; त्यावर्षी त्या देशात एक रूपयाचादेखील व्यवहार होत नसतो…”
त्यानंतर काही मंडळींनी त्यांचे चांगलेच ट्रोलिंग केले. “राहुल गांधीसुद्धा असे विधान करणार नाही,” असा टोमणा एकाने मारल्यानंतर दुसरयाने खोचक टिप्पणी केली, की “अर्थतज्ज्ञ हरी नरके यांचा राहुल गांधी यांच्यासोबत लवकरच संवाद पाहायला मिळेल…” आणखी एकाने लिहिले, “तुम्ही डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांवर पुस्तके लिहिली आहेत. ते खूप प्रथितयश अर्थतज्ज्ञ होते. त्यांच्याकडून कसे काहीच शिकला नाही…?”
बलवंत या ट्विटरकर्त्याने लिहिले, “अर्थशास्त्र हा तुमचा प्रांत नाही. तेव्हा उगीच काही ट्विट करून स्वतःच हसं करून घेऊ नका. ठीक आहे, तुम्ही मोदी विरोधक आहात; पण प्रथम पूर्ण योजना जाहीर होऊ द्यात. मगच त्यातील त्रुटी दाखवायला तुम्हाला अधिकार आहे…”
‘जीडीपी’ म्हणजे त्या वर्षात सर्व वस्तू आणि सेवा यांच्यासाठी झालेला अर्थव्यवहार. त्यामुळेच जीडीपीला देशाच्या आर्थिक विकासाचा आरसा मानला जातो. २०२० मध्ये भारताचा जीडीपी २.९४ ट्रिलियन डाॅलर म्हणजे ढोबळ मानाने दोनशे लाख कोटी रूपये आहे. त्यामुळे भारत ही सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. अनुक्रमे अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीनंतर भारताचा क्रमांक लागतो. या जीडीपीच्या (दोनशे लाख कोटी रूपयांच्या) दहा टक्के म्हणजे दोन लाख कोटी रूपयांचे पॅकेज मोदींनी जाहीर केले आहे.