कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना तंत्रज्ञान किंवा अर्थव्यवस्थेचे ज्ञान किती हाच प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांवर विचार करण्याची गरज नाही. मात्र, चीनी व्हायरस विरुध्दच्या लढाईसाठी कवच असलेले ‘आरोग्य सेतू अॅप’ पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यावरून नागरिकांवर निगराणी ठेवली जात नसल्याचे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. याबाबत केलेले सगळे आरोप निराधार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांना तंत्रज्ञान किंवा अर्थव्यवस्थेचे ज्ञान किती हाच प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांवर विचार करण्याची गरज नाही. मात्र, चीनी व्हायरस विरुध्दच्या लढाईसाठी कवच असलेले आरोग्य सेतू अॅप पूर्णपणे सुरक्षित आहे.
त्यावरून नागरिकांवर निगराणी ठेवली जात नसल्याचे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. याबाबत केलेले सगळे आरोप निराधार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरोग्य सेतू अॅप अत्याधुनिक पद्धतीने तयार केलेले निगराणी अॅप असल्याचा आरोप केला होता. यामुळे गोपनीयता व डाटाची सुरक्षितता यावर प्रश्नचिन्ह उभे राहात आहे, असे त्यांनी म्हटले होते. फ्रान्सचा हॅकर इलियट अॅल्डरसन (टोपण नाव) यानेही या अॅपच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हे अॅप डाऊनलोड करणार्या ९ कोटी भारतीय जनतेचे खासगी माहिती भंग होण्याचा धोका आहे, असेही त्याने म्हटले आहे. मात्र, रवीशंकर प्रसाद यांनी याबाबतचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रसाद म्हणाले, कोट्यवधी लोक या अॅपचा वापर करत आहेत, हेच याच्या सुरक्षिततेचे द्योतक आहे. राहूल गांधी यांना तंत्रज्ञान किंवा अर्थव्यवस्थेचे ज्ञान किती यावर चर्चा होऊ शकते, मात्र आरोग्य सेतू अॅपवर त्यांनी केलेल्य आरोपांवर होणारी चर्चाच गैर आहे.
चीनी व्हायरसवर कोणतेही औषध अद्याप तरी नाही. यावेळी केवळ त्यापासून बचाव करणे हाच उपाय आहे. या वेळी आरोग्यसेतू अॅपद्वारे तंत्रज्ञानाचा वापर करून चीनी व्हायरसच्या संकटापासून लोकांना सुरक्षित ठेवले जात आहे. त्यांना बाधित रुग्णांपासून दूर राहण्याचा इशारा दिला जात आहे. त्यामुळे या काळात राजकीय आरोप करणे चुकीचे आहे.
देशातील १३० कोटी जनतेपैकी १२१ कोटी लोक मोबाईल वापरतात. त्यातील ६० कोटी लोकांकडे स्मार्टफोन आहेत. त्यामुळे आरोग्य सेतू अॅपद्वारे जवळच्या परिसरता चीनी व्हायरसचा रुग्ण आहे का याबाबत इशारा मिळणे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आतापर्यंत ९.५ कोटी लोकांनी हे अॅप डाऊनलोड करून त्याचा वापर सुरू केला आहे.
याचा अर्थ इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी त्यावर विश्वास ठेवला आहे. यामध्ये डाटाचोरीची कोणतीही शक्यता नाही कारण त्यामध्ये कोणाचे नावच नोंदविले जात नाही. यामध्ये ३० दिवसांत सामान्य माणसाचा सर्व डाटा डिलीट करून टाकला जातो. चीनी व्हायरसच्या रुग्णाचा डाटा ४५ ते ६० दिवसांत उडवून टाकला जातो, असे प्रसाद म्हणाले.