कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी श्रमिक ट्रेनसाठी मजुरांचे रेल्वेचे भाडे देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, आता त्या कॉंग्रेसच्याच राजस्थान सरकारला जाब विचारणार का? अशोक गेहलोत यांच्या सरकारने कोटा येथून विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशात पोहोचविण्यासाठी चक्क ३६ लाख रुपयांचे भाडे वसूल केले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी श्रमिक ट्रेनसाठी मजुरांचे रेल्वेचे भाडे देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, आता त्या कॉँग्रेसच्याच राजस्थान सरकारला जाब विचारणार का? अशोक गेहलोत यांच्या सरकारने कोटा येथून विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशात पोहोचविण्यासाठी चक्क ३६ लाख रुपयांचे भाडे वसूल केले.
देशभरात अडकलेल्या मजूर-विद्यार्थ्यांसाठी कॉंग्रेस मगरीचे अश्रू ढाळत आहे. उत्तर प्रदेशात प्रियांका वड्रा यांनी तर त्यासाठी बसची नौटंकीही केली. मात्र, त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली असलेल्या राजस्थानच्या सरकारने असंवेदनशिलतेची सीमा पार केली. विद्यार्थ्यांना कोटा येथून उत्तर प्रदेशात नेणाºया बसेससाठी ३६ लाखांहून अधिक रुपयांचे भाडे आकारले. उत्तर प्रदेश सरकारने हे भाडे शुक्रवारी चुकते केले. राजस्थान सरकारने हे बिल बुधवारी उत्तर प्रदेश सरकारला पाठवले होते.
एकूण ३६ .३६ लाख रुपयांचे भाडे मागणाऱ्या राजस्थान सरकारवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार मृत्युंजय कुमार यांनी टीकास्त्र सोडले आहे. हा राजस्थान सरकारचा अमानवीय चेहरा असल्याचे ते म्हणाले. लॉकडाउनमुळे राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडण्याचा निर्णय एप्रिल महिन्यात घेतला होता, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे संचालक राज शेखर यांनी सांगितले.
कोटा येथे फसलेल्या उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आम्ही बसेस उपलब्ध केल्या होत्या, मात्र आम्हाला अतिरिक्त बसेसची आवश्यकता होती असेही राज शेखर म्हणाले. कोटा येथे उपलब्ध असलेल्या राजस्थान परिवहन महामंडळाच्या बसेस या विद्यार्थ्यांना आग्रा आणि मथुरा येथे सोडण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या.या बसेसचे सर्व भाडे उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाने चुकवले.
एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेशातील हजारो विद्यार्थ्यांना कोटा येथून त्यांच्या उत्तर प्रदेशातील घरी पोहोचवण्यात आले होते. हे सर्व विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते.