स्थलांतरीत मजुरांना राज्यात आणल्यावर त्यांच्यासाठी रोजगाराची तयारी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने केली आहे. या मजुरांना रोजगार देण्यासाठी सर्व गावांतील शाळांचा कायापालट करण्यात येणार आहे.
वृत्तसंस्था
लखनऊ : स्थलांतरीत मजुरांना राज्यात आणल्यावर त्यांच्यासाठी रोजगाराची तयारी उततर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने केली आहे. या मजुरांना रोजगार देण्यासाठी सर्व गावांतील शाळांचा कायापालट करण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेश सरकारने देशाच्या सर्व भागांत काम करणार्या आपल्या स्थलांतरीत मजुरांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत परवानगी दिल्यावर तर या कामाला आणखीनच गती आली आहे. मात्र, लाखो मजूर राज्यात परत आल्यावर त्यांना बसवून ठेवता येणार नाही. यासाठी राज्यातील सर्व शाळांचा कायाकल्प करण्याची योजना आखली आहे. ग्रामपंचायत पातळीवर हे काम होणार आहे. यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे.
पहिल्या टप्यात शाळांमध्ये स्वच्छ पाण्याची व्यवस्था, विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांपासून ते परिसराच्या सुशोभिकरणापर्यंतची कामे केली जाणार आहेत. वेगवेगळ्या राज्यांतून येणार्या या मजुरांना काम करताना शारीरिक अंतराचे नियम पाळावे लागणार आहेत.
योगी सरकारने आत्तापर्यंत दिल्ली आणि परिसरातून ४ लाख मजुरांना परत आणले आहे. मात्र, गृह मंत्रालयाच्या निर्णयानंतर संपूर्ण देशातून यापेक्षा कितीतरी अधिक कामगार परत येण्याची शक्यता आहे. यासाठी सगळ्याच राज्यांकडून आकडेवारी मागविली गेली आहे. मजुरांना त्यांच्या गृह जिल्ह्यात पाठविले जाणार आहे.
योगी आदित्यनाथ यांनी परराज्यात अडकलेल्या मजुरांना आवाहन केले आहे की पायी चालत येऊ नका. उत्तर प्रदेश सरकार त्यांची व्यवस्था करेल. त्यासाठी बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे.