उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा अखेर मुंबईत सापडला आहे. कामरान खान असे या तरुणाचे नाव आहे. उत्तर प्रदेश पोलीसांच्या ताब्यात त्याला देण्यात येणार आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा अखेर मुंबईत सापडला आहे. कामरान खान असे या तरुणाचे नाव आहे. उत्तर प्रदेश पोलीसांच्या ताब्यात त्याला देण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेश मधील लखनऊ येथे पोलिसांच्या वतीने नागरिकांच्या मदतीसाठी सोशल मीडिया डेस्क सुरू करण्यात आला होता. या डेस्कसाठी असलेल्या मोबाइल क्रमांकावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याचा एक निनावी संदेश आला होता. या संदेशामुळे उत्तर प्रदेशमधील पोलिस यंत्रणा दक्ष होत तपास करत होती. याबाबत लखनऊ येथील गोमतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला.
हा फोन महाराष्ट्रातून आल्याचे कळताच याबाबतची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी एटीएसला दिली आणि तपासाची चक्रे फिरली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने कामरान खान या तरुणाला चुनाभट्टी येथील म्हाडा कॉलनीतून शोधून काढले.
कामरानला उद्या रविवारी न्यायालायात हजर करण्यात येणार असून ट्रान्झिट रिमांड मंजूर केल्यास त्याचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांना देण्यात येईल, अशी माहीती एटीएसच्या एका अधिकाऱ्याने दिली.