विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इशारा दिलाय, तो आपल्याला कोरोनाचे गांभीर्य समजावे म्हणून…!! आपण पँनिकचे बटन दाबून धरून सैरभैर होण्यासाठी नाही. मोदींचे भाषण काल रात्री साडेआठला संपले आणि किराणा मालाच्या, औषधांच्या दुकानापाशी रांगा लागल्या. हे चित्र अवघ्या अर्धा तासात सर्वत्र दिसले. त्यानंतरच्या तासाभरात दुकानदारांनी वस्तूंचे भाव अव्वाच्या सव्वा लावून विकले, हे कोणाच्या लक्षातही आले नाही. किराणा माल, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नाही, असे स्वत: मोदी आणि राज्य सरकारे घसा फोडून सांगत होती आणि दुकानदार बिनदिक्कतपणे आटा संपला, गहू संपला, तांदूळ संपले, असे सांगत होते. त्यामुळे सामान्य माणसाचे पँनिक बटन जास्तच जोरात दाबले गेले. मोदींच्या भाषणानंतर खुलासा आला, किराणा मालाची, औषधांची दुकाने उघडी राहतील. मुख्यमंत्र्यांनीही फेसबुक लाइव्ह करून हाच खुलासा केला पण तो एेकायला लोक लाइव्ह नव्हते. ते दुकानांच्या रांगांमध्ये उभे होते. एरवी दुकानदारांशी रुपरुपयासाठी घासाघीस करणारे काल दुकानदारांचे खरे “गिर्हाइक” बनले होते. माणूस पँनिक होऊन स्वत:हून “गिर्हाइक” बनायला आलाय, म्हटल्यावर दुकानदार तरी कशाला सोडील…!! त्याने तासाभरात आपले उखळ पांढरे करून घेतले. नंतर माल संपल्याचे सांगून मोकळे झाले. पण या स्टोरीत खरी मेख पुढे आहे. ज्यांनी काल रात्री अव्वाच्या सव्वा भाव लावून माल विकला,
त्यावेळी पोलिसांच्या गाड्या रस्त्यावरून लोकांना आवाहन करीत फिरत होत्या. त्यांनी दुकानांपुढच्या रांगांचे चित्र टिपले असणार. रस्त्यावर फिरणार्यांना काल पोलिस चाप लावत होते. ते योग्यही होते. तसाच चाप रांगा असणार्या दुकानदारांनाही लावावा. बर्याच गोष्टी बाहेर येतील. कदाचित काल संपलेला माल अचानक “सापडेल.” बेहिशेबी दराने विकलेल्या मालाचा हिशेबही सापडेल…!! कोरोनाच्या पँनिक बटनच्या निमित्ताने पोलिसांनी हे करावे. सध्याच्या कार्यक्षमतेच्या काळात पोलिसांना हे अवघड नाही. पोलिसांनी काल सकाळीच मास्कचा काळा बाजार करणारे पकडले. पोलिसांनी दुकानदारांनाही हाच “नियम लावला” तर कदाचित दुकानदार आणि रांगा लावणारे लोक ताळ्यावर येतील…!! कदाचित आपले काय “चुकले” हे काउंटरच्या आतल्यांना आणि बाहेरच्यांनाही समजेल…!! आणि भविष्यात पँनिकची बटने दाबून धरायचे प्रमाण कमी होईल. आशा करु या…!!