गेल्या काही दिवसांपासून राज्यात दारूच्या दुकानांसमोर प्रचंड गर्दी गोळा होत असल्याचे चित्र आहे. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडवून मद्यपी रांगा करत आहेत. दारुची दुकाने पुन्हा बंद होतील, या भीतीतून मद्यपी गर्दी करत आहेत. राज्य सरकारच्या धोरणांमध्ये सातत्याचा अभाव असल्याचे वास्तव याच्या मुळाशी आहे. या संंबंधी इतके दिवस झोपून असलेला उत्पादन शुल्क विभाग आता जागा झाला आहे. आता दुकानांपुढची गर्दी ओसरल्यानंतर मद्यासाठी ई-टोकन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : गेल्या काही दिवसांपासून दारूच्या दुकानांसमोर प्रचंड गर्दी झाल्याच्या बातम्या आणि फोटो राज्यभरातून आले. दुकानांसमोर झुंबड उडवून देत मद्यपींनी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग या दोन्हीचा फज्जा उडवला. त्यावेळी दारू दुकानांचे नियमन करण्याची जबाबदारी असलेला उत्पादन शुल्क विभाग झोपून राहिला. आता गर्दी कमी झाल्यावर मद्यासाठी ई-टोकन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा करताना मद्याच्या दुकाने उघडतील असे सरकारने जाहीर केले होते. महाराष्ट्रातही प्रतिबंधीत क्षेत्रे वगळता रेड झोनपासून सर्व झोनमध्ये दारूची विक्री सुरू करण्यात आली होती. ही घोषणा झाल्यावर दारूच्या दुकानांसमोर रांगा दिसू लागल्या. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले नाही. त्यामुळे पोलीसांना मोकळे रान मिळाले. यामध्ये पोलीसांनी संधी साधून अनेक आर्थिक तडजोडीही केल्या. अनेक दारू दुकानांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून वसुलीही केली. या सगळ्यामध्ये दारू दुकानांचे नियमन करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाचे अस्तित्वच दिसत नव्हते.
एरवी दारूचा स्टॉक तपासण्यासाठी येऊन दारू दुकानदारांना वेठीस धरणारे उत्पादन शुल्क विभागचे अधिकारी-कर्मचारी गायब झाले होते. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना तर आपल्या जबाबदारीचे भान नव्हते आणि अद्यापही नाही. त्यामुळे त्यांच्याकडून एकही वक्तव्य आले नाही. आता कदाचित लोकांचाच दारू खरेदीचा उत्साह संपला असेल किंवा त्यांच्याकडे पैसेच उरले नसतील. त्यामुळे दारू दुकानांसमोरी रांगा संपल्या आहेत.
किरकोळ गिऱ्हाईक सगळीकडे दिसत आहे. आता उत्पादन शुल्क विभागाने निर्णय घेतला आहे. ई-टोकन व्यवस्था सुरू केली असून त्यासाठी वेबसाईटही तयार केली आहे. ज्या ग्राहकांना मद्य खरेदी करायचे आहे अशा ग्राहकांनी या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करूनटोकन प्राप्त करणे गरजेचे आहे. सुरुवातीला ग्राहकाने आपला मोबाईल नंबर व नाव नमूद करायचा आहे. त्यानंतर आपला जिल्हा व पिन कोड नमूद करायचा आहे आणि सबमिट बटणवर क्लिक करायचे आहे. त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणा-या मद्य विक्री दुकानांची यादी दिसेल. दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल. आवश्यक माहिती नमूद केल्यानंतर ग्राहकास इ टोकन मिळेल. या टोकन आधारे ग्राहक आपल्या सोयीच्या वेळी सबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून मद्य खरेदी करु शकतात.
यामध्ये आणखी एक प्रश्न म्हणजे दारू पिण्याचा परवाना असल्याशिवाय खरेदी करता येत नाही. त्यामुळे नोंदणी करून दारू खरेदी करण्यासाठी कोण जाणार हा प्रश्न आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारमध्ये सध्या परस्परविरोधी अधिसूचना काढण्याची स्पर्धा लागली आहे. त्यामध्ये उत्पादन शुल्क विभागही उतरला आहे,