- काँग्रेसने स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती केली नाही
- मजूरांबरोबरचे काँग्रेस नेत्यांचे विडिओ ही नाटकबाजी
विशेष प्रतिनिधी
लखनौ : कोरोनाच्या महासंकटात कोट्यावधी मजूरांवर पायपीटीची वेळ आलीय ती काँग्रेसनेच आणली. कारण वर्षानुवर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसने शहरे, गावांमध्ये रोजगारच उपलब्ध करून दिले नाहीत, अशा शब्दांत बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
मायावतींचे हे वक्तव्य बहुजन समाज पक्षाच्या उत्तर प्रदेश शाखेने जारी केले आहे. यात मायावती म्हणतात, काँग्रेसने आपल्या राजवटीत स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीची धोरणे राबविलीच नाहीत. म्हणून मागास राज्यांमधील मजूरांना रोजगारासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागले. आणि आज कोरोनाच्या महासंकटात आपापल्या राज्यांमध्ये परतण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मजूरांवर ओढवलेल्या या दु:खद परिस्थितीसाठी मूळात काँग्रेसच जबाबदार आहे, अशी टीका मायावती यांनी केली.
काँग्रेस नेत्यांनी मजूरांशी चर्चा करतानाचे विडिओ सोशल मीडियावर टाकले आहेत. त्यातून त्यांचे मजूरांविषयीचे प्रेम न दिसता त्यांची नाटकबाजी मात्र वाटते. अशी नाटके काँग्रेस नेत्यांनी करू नयेत. भाजपने देखील मजूरांच्या हजारो मैलांच्या पायपीटीची, त्यांच्या हलाखीची खरी दखल घ्यावी. त्यांच्या अन्नपाण्याची आणि प्रवासाची सोय करावी. काँग्रेससारखी नाटकी धोरणे राबवू नयेत, असा खोचक सल्लाही मायावती यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारांना दिला.