विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेले तीन दिवस विविध पदाधिकारी, आमदार, खासदार, महापौर, जिल्हापरिषद अध्यक्ष, मंडल आणि बूथ कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष यांच्याशी एकूण 5 संवादसेतूच्या माध्यमातून संवाद साधल्यानंतर आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सुरू झालेल्या विविध सेवाकार्याचा आढावा घेतला आणि विविध सूचना केल्या.
राज्यभरात सुरू असलेल्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. सद्या सुमारे 1.25 लाख कार्यकर्ते प्रत्यक्ष कामात असून ही संख्या आणखी वाढविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. सुमारे 450 मंडलांमध्ये काम सुरू झाले असून 300 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू झाली आहेत. 10 जिल्ह्यांमध्ये रक्तदानाचे काम सुरू झाले आहे. 1000 खेड्यांमध्ये सॅनेटायझेशनचे काम करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी अन्न आणि औषध पुरवठा करण्यासोबतच शेतकऱ्यांना बियाणे आणि खते सुद्धा घरोघरी देण्याचा उपक्रम हाती घेतला, याचे फडणवीस यांनी यावेळी कौतुक केले.
या आढाव्याला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, सरोज पांडे, व्ही. सतीश, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे, मंगल प्रभात लोढा तसेच इतर प्रदेश पदाधिकारी सहभागी झाले होते.
सद्या देशभरात लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ही मदत करताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल, हेही कार्यकर्त्यांनी सुनिश्चित करावे, असे आवाहन फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. घरी राहायचे असले तरी ही सुटी नाही. त्यामुळे आपली स्वत:ची काळजी घेतानाच अधिकाधिक लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी काम करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.