काँग्रेसच्या सरचिटणिस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशात एक हजार बसने स्थलांतरीत कामगारांना पोहोचविण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणतेही राजकारण न करता लगेच परवानगीही दिली. त्यावर प्रियांकांनी त्यांचे आभारही मानले. पण आता त्यांची खरी पंचायत झाली आहे.
वृत्तसंस्था
लखनऊ : काँग्रेसच्या सरचिटणिस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशात एक हजार बसने स्थलांतरीत कामगारांना पोहोचविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परवानगी दिली. त्यावर प्रियांकांनी त्यांचे आभारही मानले. पण आता त्यांची खरी पंचायत झाली आहे.
प्रियांका गांधी यांनी एक ट्विट करून उत्तर प्रदेशच्या सीमेवर आमच्या एक हजार बस उभ्या आहेत. त्या पाठविण्याची परवानगी द्या, असे म्हटले होते. यावर परवानगी देतानाच बसचे क्रमांक आणि चालकांची यादी मुख्यमंत्र्यांनी मागितली आहे. मात्र, ही यादी द्यायची कशी असा प्रश्न आता कॉंग्रेससमोर उभा राहिला आहे. कारण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका गांधी यांनी ट्विट केले खरे पण बसची कोणतीच व्यवस्था त्यांनी केली नव्हती. केवळ आव आणण्यासाठी एक हजार बस सीमेवर उभ्या असल्याचे त्यांनी म्हटले. कॉंग्रेसच्याच काही नेत्यांनी प्रियांका गांधी यांची दिशाभूल केली, असेही कॉंग्रेसच्या गोटातून सांगितले जात आहे.
प्रियांका गांधी यांना योगी आदित्यनाथ बस आणण्याची परवानगी देणार नाहीत, ते राजकारण खेळण्याचा प्रयत्न करतील, असा कॉंग्रेसी दुढ्ढाचार्यांचा कयास होता. मात्र योगी आदित्यनाथ यांनी जनतेची सोय होत असेल तर ती कॉंग्रेसकडून होवो, की अन्य कोणाकडून अशी व्यापक भूमिका घेत प्रियांका यांना त्वरेने बस आणण्याची अनुमती दिली. परंतु, बसची व्यवस्थाच नसल्याने प्रियांका गांधी आणि कॉंग्रेसचे पितळ उघडे पडले.
त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यादी देण्याऐवजी प्रियांका गांधी यांनी वेगळेच ट्विट करुन मुळ मुद्यापासून फारकत घेतली आहे. नव्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात की, महामारीच्या काळात जीव वाचविणे, गरीबांचे रक्षण करणे आणि त्यांच्या आत्मसन्मानाचे रक्षण करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. कॉंग्रेस या कठीण काळात आपल्या पूर्ण क्षमतेने आणि सेवाभावाने कर्तव्याचे पालन करेल.