विशेष प्रतिनिधी
पुणे : विधान परिषदेसाठी पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या सप्टेंबर महिन्यात आहे. भारतीय जनता पार्टीची निवडणुकीची तयारी सुरू आहे. पक्षाकडे इच्छुकांची संख्यादेखील मोठी आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून तयारी अद्याप दिसत नाही. गेल्यावेळी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढविली होती. यावेळी ही जागा कुणाच्या वाट्याला येणार याबाबत आघाडीत अद्याप एकवाक्यता झालेली दिसत नाही.
भारतीय जनता पार्टीकडून माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख, भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, पिंपरीतील जुने कार्यकर्ते सुहास पटवर्धन, सहकार परियदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांची नावे प्रामुख्याने च्चेत आहेत. महाविकास आघाडीची स्थिती याउलट आहे. निवडणूक कुणी लढवायची याबाबत त्यांच्यात अद्याप मतभेद आहेत.
गेल्यावेळी ही निवडणूक सारंग पाटील यांनी लढविली होती. या निवडणुकीत माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सारंग पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता. सारंग पाटील हे माजी राज्यपाल व सातारा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव आहेत. आघाडीकडून काँग्रेस व शिवसेनेची ही जागा लढविण्याची कितीही इच्छा असली तरी त्यांच्याकडे सक्षम उमेदवाराच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे सारंग पाटील यांचा पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
मात्र, सारंग पाटील यांना ही निवडणूक सोपी नाही. गेल्या दोन निवडणुकात भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक जिंकली आहे.भारतीय जनता पार्टीचे पुणे, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात चांगले नेटवर्क आहे. पदवीधरांची नोंदणी ही या निवडणुकीच्या यशाचे खरे गमक आहे. या निवडणुकीची तयारीच मुळी या नोंदणीतून सुरू होते. भाजपाची ही तयारी जोरात आहे.मात्र, आघाडी अद्याप तरी खूपच मागे असल्याचे दिसत आहे.