• Download App
    पाकसाठी ‘डरना जरूरी है’; वायुसेनाप्रमुखांचा पुन्हा एअरस्ट्राईकचा इशारा | The Focus India

    पाकसाठी ‘डरना जरूरी है’; वायुसेनाप्रमुखांचा पुन्हा एअरस्ट्राईकचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय भूमीववर दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानला चिंता वाटायलाच हवी. मात्र, ते टाळावयाचे असल्यास त्यांनी भारताविरोधात दहशतवादी कारवाया थांबवाव्यात. कारण आवश्यकता भासल्यास पुन्हा एकदा एअरस्ट्राईक करण्यास भारतीय वायुसेना सज्ज आहे, असा इशारा वायुसेनाप्रमुख एअरचीफमार्शल आरकेएस भदौरिया यांनी पाकला दिला.

    काश्मीरमधील हंदवाडा येथे काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीदरम्यान भारतीय सैन्याचे पाच सैनिक हुतात्मा झाले होते. त्यानंतर पाकिस्तानविरोधात पुन्हा एकदा एअरस्ट्राईकसारखी कारवाई करण्याची गरज असल्याचे वातावरण भारतात तयार झाले आहे. त्याचप्रमाणे या चकमकीनंतर भारत आपल्याविरोधात लष्करी कारवाई करेल, अशी भिती पाकिस्तानाच्या मनात निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तसे बोलूनही दाखविले होते. भारताने बालाकोट एअरस्ट्राईक करून पाकचे कंबरडे मोडले होते, त्यानंतर भारतीय वायुसेनेची धास्ती पाकने खाल्ली आहे.

    सीमापार अथवा पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ, लाँचपॅड उध्वस्त करण्यासाठी पुन्हा एकदा बालाकोटसारखा एअरस्ट्राईक करण्याची भारताची तयारी आहे का; या प्रश्नाचे उत्तर देताना वायुसेनाप्रमुख म्हणाले की, तशी परिस्थिती निर्माण झाल्यास भारतीय वायुसेना पुन्हा एकदा एअरस्ट्राईक करण्यास २४ तास तयार आहे, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

    त्याचप्रमाणे भारतीय भूमीवर जेव्हाही दहशतवादी हल्ला होईल, तेव्हा पाकिस्तानला भिती वाटायलाच हवी. मात्र, या भितीपासून मुक्ती हवी असेल तर त्यांनी भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणे थांबविण्याची गरज आहे. असा सल्लाही त्यांनी पाकला दिला.

    पाकिस्तानला यापूर्वीदेखील लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी कठोर शब्दात इशारा दिला होता. संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढत असताना पाकिस्तान मात्र भारतासह अफगाणिस्तानात दहशतवादी कारवाया करीत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याचप्रमाणे गीलगीट आणि बाल्टिस्तानचा समावेश हवामान खात्याच्या दैनंदिन हवामान अंदाजात करून पाकव्याप्त काश्मीरसंदर्भातही भारताने पाकला सूचक इशारा दिला आहे. त्यानंतर आता वायुसेनाप्रमुखांचा इशारा पाहता पाकिस्तानच्या भयामध्ये आणखी वाढ होणार आहे.

    Related posts

    एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले

    कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार