• Download App
    पंतप्रधान मोदींकडून प्रेरणा घेत उद्धव ठाकरेंनीही साधला डॉक्टरांशी संवाद | The Focus India

    पंतप्रधान मोदींकडून प्रेरणा घेत उद्धव ठाकरेंनीही साधला डॉक्टरांशी संवाद

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या कोरोना बाधीतांवर उपचार करणाऱ्या नर्स आणि डॉक्टरांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले. त्यांच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. पुण्यातल्या डॉक्टर-नर्स यांच्या उभ्या आयुष्यात असा कधी प्रसंग आला नव्हता. पण थेट पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानल्याने, आपुलकीने चौकशी केल्यामुळे एकूणच सरकारी क्षेत्रातील वैद्यकीय डॉक्टर-नर्स-कर्मचाऱ्यांमध्ये हजार हत्तींचे बळ संचारले आहे. पंतप्रधानांच्या या संवेदनशीलतेचे प्रचंड कौतुक उभ्या देशात सुुरु झाले. यातून प्रेरणा घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रविवारी दुपारी पंधरा मिनिटांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे नायडू रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.

    विशेष म्हणजे ठाकरे यांच्या या संवादापुर्वी पुण्यातल्या ऐतिहासिक ससून रुग्णालयातील डॉ. रोहिदास बोरसे यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रविवारी संवाद साधला. मन की बात या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी यांनी डॉक्टरांशी संवाद साधला. ‘नमस्ते डॉक्टर, तुम्ही प्रभुसेवेप्रमाणे जनसेवा करत आहात… कोरोना विषयी लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत… देशवासियांना तुमच्या कडून संदेश हवा आहे…’ असे मोदी यांनी विचारले. पंतप्रधानांच्या या नम्रतेमुळे डॉ. बोरसे यांना क्षणभर बोलणे सुचले नाही.

    कोरोना रुग्णांची स्थिती जाणून घेतल्यानंतर मोदी यांनी ‘तुम्हा सर्वांच्या मदतीने कोरोनाविरोधातली लढाई देश जिंकेल,’ असा विश्वास व्यक्त केला. तेव्हाही डॉ. बोरसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला. ‘हम जितेंगे’ असा विश्वास डॉ. बोरसे यांनीही पंतप्रधानांना दिला. पंतप्रधान मोदींनी दोनच दिवसांपूर्वीच नायडू रुग्णालयातील परिचारिका छाया जगताप यांच्याशी फोनवरुन संवाद साधत त्यांचे कौतुक केले होते. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिसीन विभागात डॉ. बोरसे हे प्राध्यापक आहेत. नायडू रुग्णालयातल्या कोरोना कक्षाची जबाबदारी सध्या त्यांच्यावर आहे. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले, की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट संवाद साधल्याने आम्हाला प्रचंड बळ मिळाले. कोरोनाशी लढणाऱ्या ससून आणि नायडू रुग्णालयातल्या डॉक्टर, परिचारिका आणि सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक पंतप्रधान करतात, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात, यामुळे एक वेगळीच भावना आमच्यात निर्माण झाली आहे. सगळेजण झटून काम करत आहेत. पंतप्रधानांकडून कौतुक झाल्याचा अभिमान प्रत्येकाला वाटतो आहे.

    मुख्यमंत्री ठाकरेंकडूनही कौतुक, दिलासा

    पंतप्रधान मोदी यांच्याकडून प्रेरणा घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी रविवारी डॉ नायडू रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक करुन सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे असल्याचा दिलासा ठाकरेंनी दिला.

    देशातील जनतेला आणि एकूणच वैद्यकीय क्षेत्राला अभिमान वाटावा असे काम तुम्ही करत असल्याचे ठाकरे म्हणाले. कोरोना रुग्णांच्या प्रकृतीबाबत त्यांनी विचारणा केली. मुख्यमंत्र्यांच्या या संवादामुळे आपल्या कामाची दखल घेतली जात आहे, कोणीतरी आपलीही काळजी घेत आहे याचे समाधान मिळाले असल्याची भावना या संवादात सहभागी झालेल्यांनी व्यक्त केली.

    Related posts

    एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले

    कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार